Ajit Pawar News : अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात बॅंकांची भूमिका महत्त्वाची : उपमुख्यमंत्री पवार  | पुढारी

Ajit Pawar News : अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात बॅंकांची भूमिका महत्त्वाची : उपमुख्यमंत्री पवार 

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्था जगात दहाव्या स्थानी पोहोचली आहे. ती पाचव्या क्रमांकावर आणण्यासाठी ५ ट्रिलियन डाॅलरचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्राने १ ट्रिलियन डाॅलवर अर्थव्यवस्था नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात बॅंकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
संबंधित बातम्या :
बारामती सहकारी बॅंकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष किशोर मेहता, कार्यकारी संचालक रवींद्र बनकर, व्यवस्थापक विनोंद रावळ यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी नगराध्यक्ष जयश्री सातव, भारती मुथा, योगेश जगताप, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, अॅड. अशोक प्रभूणे, स्वरुपराजे खर्डेकर, मिलिंद टांकसाळे आदींची उपस्थिती होती.
पवार म्हणाले, केंद्रात प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी असताना रिझर्व्ह बॅंकेकडून देशात पाच ते सात ठराविक बॅंकाच सुरु ठेवण्याविषयी चर्चा सुरु होती. आता सहकार मंत्री अमित शहा यांनी सूचना केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने कार्यपद्धतीत बदल केला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास हे नागरी सहकारी बॅंकांशी चर्चा करत त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. हा बदल निश्चित चांगला आहे. अनेक राष्ट्रीयकृत बॅंका ५० टक्क्यांपर्यंतचे कर्ज राईट आॅफ करत आहेत. हा विषय संसदेचा आहे नागरिक त्याविषयी न्यायालयात जावू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे धोरण आखले असून त्यात बॅंकांची भूमिका महत्त्वाची आहे.
गत आर्थिक वर्षात विक्रमी वसूली करणाऱया संचालक मंडळाच्या कारभाराचे पवार यांनी कौतुक केले. एनपीए तीन टक्केच्या आत आणण्यासाठी प्रयत्न करा, वसूलीसाठी प्रसंगी कठोर भूमिका घ्या, शिवाय पुढील वर्षी सभासदांना दोन आकडी लाभांश द्या तरच वार्षिक सभेला मी येईल, असेही पवार म्हणाले. अनेक राष्ट्रीयकृत बॅंका मर्ज होत आहेत. सहकारी बॅंका, जिल्हा बॅंका अडचणी आल्या त्याला संचालक व व्यवस्थापनाने दिलेली चुकीची कर्जे कारणीभूत ठरली. सहकारात शिस्त महत्त्वाची आहे.
पारदर्शक, लोकाभिमुख व आदर्शवत कारभार बारामती बॅंकेचा सुरु आहे. अन्य जिल्ह्यातील ग्राहक केवळ बारामती या नावामुळे आपल्याशी जोडले जात आहेत. आदर्श बॅंक म्हणून नावलौकीक वाढतो आहे. असेही पवार म्हणाले.  यावेळी करीम बागवान, तैनूर शेख, संभाजी माने, ज्ञानदेव बुरुंगले, सूर्यकांत गादिया, बाबुराव कारंडे, प्रभाकर बर्डे आदींनी प्रश्न उपस्थित केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची विक्रमी कर्ज प्रकऱणे मंजूर केल्याबद्दल प्रदीप शिंदे यांनी बॅंकेचे अभिनंदन केले. अध्यक्ष सचिन सातव यांनी प्रास्ताविकात बॅंकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. कार्यकारी संचालक रवींद्र बनकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.
बारामती सहकारी बॅंकेच्या ३७ शाखा आहेत. बारामतीत चार शाखा आहेत. अन्य ३३ शाखा बाहेर आहेत. बॅंकेत नोकऱयांसाठी बारामतीकरांना प्राधान्य दिले आहे. आता ही मंडळी बारामतीत बदलीसाठी आग्रह धरत आहेत. त्यांनी बाहेर नोकरी करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. प्रत्येकाला स्थानिक पातळीवरच नेमणूक मिळणे शक्य नाही. असेच घडत राहिले तर यापुढे ज्या जिल्ह्यात शाखा सुरु केली जाईल तिथे त्या ठिकाणच्या उमेदवारांनाच गुणवत्तेच्या आधारे संधी देण्यात येईल. तुम्ही राज्याबाहेर तर काम करत नाही ना, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदली मागणारांची कान उघडणी केली.
हेही वाचा

Back to top button