पुणे; पुढारी वृत्तसेवा : गौराई आणि पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर आठवड्याचा शेवटचा दिवस आणि दुसर्या दिवशी साप्ताहिक सुटी, या पार्श्वभूमीवर पावसाची तमा न बाळगता देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी रात्री गणेशभक्तांची अलोट गर्दी लोटली होती. सामाजिक व आध्यात्मिक विषयांवरील देखावे आणि बाहेरगावाहून आलेल्या गणेशभक्तांमुळे उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला होता.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील आणि देशविदेशातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेला पुण्यातील गणेशोत्सव मंगळवारपासून मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जात आहे. गणेशभक्तांचे मुख्य आकर्षण असलेल्या शहरातील विविध पेठांमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध विषयांवरील सामाजिक, राजकीय व आध्यात्मिक विषयांवर सजीव व हलत्या देखाव्यांसह विविध मंदिरांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच हे देखावे पाहण्यासाठी आणि लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त मोठी गर्दी करीत आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून आणि ग्रामीण भागातून शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येणार्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दिवस ओढ दिलेला वरुणराजाही दोन दिवसांपासून दमदारपणे बरसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये व गणेशभक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
घरोघरी सोनपावलांनी आलेल्या गौराईंचे आणि पाचव्या दिवसाच्या बाप्पाचे शनिवारी विसर्जन झाले. त्यातच पाचव्या दिवसापासून राज्य सरकारने रात्री बारापर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बरसणार्या पावसाची तमा न बाळगता देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची रात्री गर्दी लोटली होती. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक जण छत्री घेऊन आले होते.
शहरात दुपारपासून रात्री नऊपर्यंत धो-धो पडणार्या पावसाने त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांच्या गर्दीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी रस्ता आणि थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावर विशेष गर्दी पाहायला मिळाली. रस्त्याच्या कडेला वडापाव विकणार्यांपासून ते श्रींच्या मूर्तीची विक्री करणार्या दुकानदारांमुळे उत्सवाला जत्रेचे स्वरूप आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था केली होती. त्यामुळे चारचाकी गाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा अडथळा दूर झाला. मात्र, दुचाकीस्वारांमुळे पादचार्यांना चालताना कसरत करावी लागत होती.
पूर्वी शासनाकडून गणेशोत्सवामध्ये पाचव्या, सातव्या, नवव्या दिवशी रात्री बारापर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी दिली जात होती. यंदा मात्र पाचव्या दिवसापासून सलग दहाव्या दिवसापर्यंत रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात नऊ दिवस परवानगी दिली जाते, तशाच प्रकारे गणेशोत्सवासाठीही दहा दिवस परवानगी मिळावी, अशी आमची गणेश मंडळांची मागणी आहे.
– बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, ट्रस्ट
हेही वाचा