बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणातून शिरसाई तलावात पाणी सोडून ते पुढे शिरसाई उपसा सिंचन योजनेद्वारे बारामती तालुक्यातील १४ गावांना मिळावे यासाठी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे चक्री उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी उपोषणाचा अधिकार आहे. परंतु पाण्याची परिस्थिती समजून घ्या, असे आावाहन पवार यांनी केले. बारामतीत एका कार्य़क्रमात पवार यांनी यासंबंधी भाष्य केले. मी सरकारमध्ये नसतो तर निरा उजवा आणि डावा कालव्याला पाणी सुटलेच नसते, असेही पवार म्हणाले.