Sharad pawar/Ajit pawar : अजितदादांसमोर शरद पवार गटाची तरूण फळी; भविष्यात दोन गटात संघर्ष अटळ | पुढारी

Sharad pawar/Ajit pawar : अजितदादांसमोर शरद पवार गटाची तरूण फळी; भविष्यात दोन गटात संघर्ष अटळ

मिलिंद कांबळे

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पूर्वीपासूनच शहरावर मजबूत पकड असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे बहुतांश पदाधिकारी कायम आहेत. या परिस्थितीला डगमगून न जाता शरद पवार गटाने शहरातील नव्या दमाच्या तरुण पदाधिकार्‍यांना बरोबर घेतले. नवीन फळी उभी करीत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीतील या दोन्ही गटातील हा संघर्ष भविष्यात आणखी पेटणार असे सध्या दिसत आहे. (Sharad pawar)

संबंधित बातम्या :

शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी स्वतंत्र चूल मांडली. ते राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. शहरावर पूर्वीपासून मोठी पकड असल्याने राष्ट्रवादीचे जवळजवळ 90 टक्के स्थानिक पदाधिकारी अजित पवारांसोबत गेले. त्यानंतर तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची शरद पवार गटाने शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर दोनच दिवसांत अजित पवारांनी गव्हाणे यांना आपल्या पक्षाचा शहराध्यक्ष घोषित केले. शरद पवार गटाने 9 सदस्यांची कार्यकारिणी समिती स्थापन केली. युवक, महिला आणि विविध सेलचे शहराध्यक्ष नेमले. (Ajit pawar)

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची शनिवारी (दि. 16) शहराध्यक्ष म्हणून घोषणा केली. या निवडीमुळे शरद पवार गट चर्चेत आला आहे. भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन ते राष्ट्रवादीत आले होते. कामठे हे निवडून आलेले तरूण माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या हातात राष्ट्रवादीची शहराची संपूर्ण सूत्रे आल्याने अजित पवार गटाला धक्का बसला आहे. कामठे हे स्थानिक आहेत.

त्यांचे शहरात नातेगोते व मित्र मंडळीचे जाळे मोठे आहे. नव्या जोशाच्या तरुणांना घेऊन ते शहर कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार आहेत. अजित पवार गटाचा सामना करण्यासाठी पर्यायी सक्षम पदाधिकार्‍यांची फळी उभी केली जात आहे. ही बाब अजित पवारांना धोक्याची घंटा ठरू शकते. थेट अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मार्गदर्शन आणि आ. रोहित पवार यांची साथ लाभल्याने नवनियुक्त शहराध्यक्ष कामठे यांची कारकीर्द लक्षवेधी ठरू शकते.

प्रभागस्तरावर पक्ष संघटन मजबूत करणार

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व 32 प्रभाग पिंजून काढून नव्याने पक्ष बांधणी केली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा पुरोगामी विचार नागरिकांना पटवून देत आहोत. येत्या महिन्या दीड महिन्यात शहर कार्यकारीणी जाहीर केली जाईल. त्यानंतर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरात पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडसाठी आ. रोहित पवारांचा चेहरा

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर तब्बल 15 वर्षे अजित पवार यांनी वर्चस्व गाजविले. त्यांच्यामुळेच शहराचे रूप पालटले असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार सांगितले जाते. तसेच, अजित पवार ही सतत त्याबाबत दावा करतात. शरद पवार गटासाठी शहराला स्वतंत्र असा नेता नव्हता. आमदार रोहित पवार यांच्याकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी दिल्याचे स्पष्ट संकेत आहेत. शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच, शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे उपस्थित नव्हते. आ. अजित पवारांना शह देण्यासाठी रोहित पवार हे तरुणाईची नवी फळी निर्माण करत आहेत. शहरात पक्ष संघटन वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा शहरात किती जम बसतो, हे लवकरच स्पष्ट होईल. दुसरीकडे, अजित पवारांपाठोपाठ रोहित पवार असे दोन नेते स्थानिक राष्ट्रवादीला मिळणार आहेत.

हेही वाचा

जात-धर्मावरून केंद्राकडून दिशाभूल : प्रियांका गांधी-वधेरा

कुडाळ : वासुदेवाचा पेहराव करून पैसे उकळणारी टोळी पोलिसांच्या ताब्‍यात

Aamy Jackson : होसाना फेम एमी जॅक्सनचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, अयशस्वी ठरली प्लास्टिक सर्जरी?

Back to top button