रायगड : भाद्रपद शुद्ध राष्ठीला दरवर्षी येणान्या गौरीची परंपरा राज्यासह देशभरात विविध पद्धीतने जोपासली जाते. त्यातून गौरीची अर्थात देवीची विविध रुपे आणि प्राचीन कथांना उजाळा मिळत असतो, त्याच बरोबर आपल्या पूर्वजांनी सुरु केलेल्या श्रद्धेय धार्मीक पद्धती नव्या पिठाकडे सुपूर्द करून त्यापुढे अखंड सुरु राहात आणि त्यातून आपला धार्मीक व सांस्कृतीक वारसा अबाधीत राहातो. अशा प्रकारची डोक्यावर गौराईला घेऊन तीच्या पाटाला हात न नावता तीला घरी आणून पूजन करून पून्हा डोक्यावर घेऊन पाटाला हात न लावता ती नाचवण्याची अत्यंत प्राचीन परंपरा पेण तालुक्यांच्या खारेपाटात जोपासली जात असल्याची माहिती खारेपाटातील प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचे अभ्यासक देवीदास म्हात्रे गुरुजी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
खारेपाटातील या प्राचीन परंपरेमागील कथा सांगताना म्हात्रे गुरुजी म्हणाले, एकदा शंकराने पार्वतीला काली असे संबोधले. पार्वतीला राग आला तीने ब्रम्हदेवाची उपासना केली. ब्रम्हदेवाला प्रसन्न करून तिने गौर वर्ण प्राप्त केला. शंकराने तिला गौरी हे नाम दिले. अशी हि गौर म्हणजे उमा, पार्वती, जगदंबा अशी हि भूदेवता, जलद- देवता, सृजनांची देवता आहे. गौरी हे पार्वतीच दुसरं नाव. हिचे आगमन चार वेळा होते. प्रथम येणारी चैत्रातली चैत्रगौर, श्रावणातील मंगळागौर, भाद्रपदातील हरितालीका आणि चौथी गणेश आगमनानंतर येणारी जेष्ठा गौरी गौरी ही शक्ती असून अध्यात्मिक दृष्टी तिला शिवरूप आत्म्याची ब्रम्हकार वृत्ती मानले जाते. माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीचे आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता मानली जाते.
नारायण हरी बोले,
ओवाळीता का जगदंबा ।
जमितो जगदंबा जगदंबा ।
या मंगल चरणाने आरती म्हटली जाते. गौरी जवळ भजने, महिलांचा भवर नाच, रामायण, महाभारत तसेच १७ जुलै १९४७ च्या बुडालेल्या रामदास बोटीचे गाणे म्हटले जाते, पुरुषांचा नाच सादर केला जातो, स्त्रियांचे उखाणे, झिम्मा, फुगडी, कोंबडा, हे खेळ खेळले जातात. त्यानंतर गौरीला मालभूय म्हणजे माळ दाखवला जातो. माळ दाखवताना काही थोड्या खिया गौरीच्या पाटाला हात न लावता दोन्ही हात सोडून शिडीच्या ३ ते ४ पायच्या डोक्यातील गौरीच्या पाटाला स्पर्श न करता चढतात व उतरतात. गौरीची पारंपारीक गाणी म्हणतात. पाती तिच्या दुबळ्या म्हणजे गरीब भावाकडे माहेरी जात असताना शंकर देव पार्वतीला म्हणतात….
नको जाऊ पार्वती दुबळ्या माहेरा।
घेईन तुला गजनीची चोळी ।
घेईन तुला सोन्याचा सूपू ।
पेण खारेपाटात शाडूमातीची गौर असते, सोबत सुपात तेरड्याची रोपे, अग्रिशिखा म्हणजेच नागवेल. नागवेलीची फुले या व विळ्या रंगाची असतात. तेरड्याची फुले तांबडी, गुलाबी, पांढरी अशा विविध रंगाची असल्यामुळे ती फार सुंदर दिसतात गौरीला कवला या वनस्पतीची भाजी आवडते. या सर्व वनस्पती या औषधी असतात. यातून मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते प्रस्थापीत होत असते असे म्हात्रे गुरुजी यांनी पूढे सांगितले.
गौर सासरहून माहेराला दिड दिवस येते पण ती आपल्या पतीदेवाची म्हणजेच शंकराची आज्ञा घेऊनच येते. मात्र ती दिड दिवसाच्या पलीकडे राह शकत नाही. माहेरवाशीणी गवरीला बबसा म्हणून २ ते ५ सुपे अर्पण करतात. त्यात फळे, फुले, सुका मेवा असतो. गौरीची पहिल्या दिवशीची आरती पूजन झाल्यावर होते..
त्रिपुर सुंदरी अंबा नमितो जलाना जगदंबा
अंबा वस्त्र नेसली का नमितो जगदंबा जगदंबा |
त्यावेळी पार्वती शंकराला सांगते घेईन मला बंधु माझा कांबीचा सुप. गौराईचा भाऊ गरीब असला तरी भावाबद्दल तिला आदरच असतो. गवर म्हणजे पार्वती माहेरी आल्यावर तो तिच्या वहिनीची, तिच्या मुलांची गवरीच्या आई वडीलांची भेट घेत असताना म्हणते…..
तुझी राजलक्ष्मी पातू ।
तुझी मुलं बाल पातु ।
तुझ्या वैरला खरखत देतु ।
गवर शेताच्या बांधावरना रं ।
पार्वती माहेराला गेल्यावर शंकराला ही माहेरहून कधी येते असं वाटतं. शंकरदेव पार्वतीला उशीर झाल्याबद्दल रागावतात देवी त्यांची समजूत काढताना म्हणते….
आईची भेट होता उशीर झाला ।
भावाची भेट घेता उशीर झाला ।
घेतली निंगुरकाठी देव मारु लागलु।
पार्वतीला उशीर झाल्यामुळे निगुर म्हणजेच निगडीच्या काठीनं देव पार्वतीला प्रेमानेच मारतात. रात्री महिला फुगडया कवडा, झिम्मा खेळ खेळलात वर दुसन्या दिवशी विसर्जन करताना खारेपाटातील महिला गवरीच्या पाटाला हात न लावता भजनासोबत नाचत नेतात. तर भालच्या सरोज अशोक म्हात्रे या शेतातील बांधावरून चिखलातून दिड तास दोन्ही हात सोडून, गवर नाचवित नेतात. हे या खारेपाटीतील गौराईचे वैशिट्य असते. अशा गोराई बढावमधील शकुंतला म्हात्रे, अहिल्या म्हात्रे, वाशीच्या संगिता पाटील, फणस डोंगरी पेण येथील रंजना राम म्हात्रे, सापोलीतील हरिचंद्र म्हात्रे यांची गौर तसेच, तांबडशेत, हमरापूर, कांदळे येथेही डोक्यावरील गौरी नाचवतात.