Nashik Ganeshotsav : POP गणेशमूर्तींंचे पाचव्या दिवशी (आजच) विसर्जन करा ; मनपा आयुक्तांचे आदेश  | पुढारी

Nashik Ganeshotsav : POP गणेशमूर्तींंचे पाचव्या दिवशी (आजच) विसर्जन करा ; मनपा आयुक्तांचे आदेश 

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातल्याने मूर्तिकार, साठवणूकदार व विक्रेत्यांकडे शिल्लक असणाऱ्या सर्व पीओपीच्या मूर्ती गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्याचे आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Nashik Ganeshotsav)

संबधित बातम्या :

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या सुधारीत मार्गदर्शक तत्वांनुसार नदी प्रदुषण व नुकसान टाळण्याकरीता केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीस पासून तयार केलेल्या मूर्तीवर बंदी जाहीर केली आहे. तसेच, उच्च न्यायालयाने देखील ही बंदी कायम केली आहे. या पार्श्वभुमीवर प्लास्टर ऑफ पॅरीसपासुन मुर्ती निर्मिती, आयात, साठा बंदीबाबत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सदर सुधारीत मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने जारी केले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरीस मुर्ती निर्मिती, आयात, साठा करणारे व्यापारी व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी १ जानेवारी २०२१ पर्यंत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने मुदतवाढ दिली होती. यासंदर्भात १२ मे २०२० रोजी प्रकाशीत केलेल्या सुधारीत मुर्ती विसर्जनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२१ पासुन बंधनकारक करण्यात आल्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील मुर्तीकारांकडे, साठवणूकदारांकडे तसेच विक्री करणाऱ्यांकडे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या उपलब्ध असणाऱ्या सर्व मुर्तींचे विसर्जन पाचव्याच दिवशी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावात करण्यात यावे, तसे न केल्यास संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिला आहे. (Nashik Ganeshotsav)

पीओपी मूर्तींवर शासनाची बंदी असून मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी बंधनकारक आहे. महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार, साठवणूकदार, विक्रेत्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पीओपीच्या मूर्तींचे पाचव्या दिवशी मनपाच्या कृत्रिम तलांवांमध्ये विसर्जन करावे, अन्यथा संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.

– विजयकुमार मुंडे,

हेही वाचा :

Back to top button