रेल्वे प्रवाशांकडील ऐवज चोरणारे अटकेत | पुढारी

रेल्वे प्रवाशांकडील ऐवज चोरणारे अटकेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रेल्वे प्रवाशांकडील पिशवीतून ऐवज चोरणार्‍या चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने अटक केली. चोरट्यांकडून सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप, असा पाच लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रवीसिंग तेजपालसिंग लुभाणा (वय 27, रा. मयूर विहार, त्रिलोकपुरी, नवी दिल्ली), शिवकुमार रेट्टामल्लाई (वय 51, रा. मिल कॉलनी, रा. त्रिचुरापेल्ली, तमिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पुणे रेल्वे स्थानक ते कर्जत स्थानक परिसरात महिला प्रवाशांकडील पिशवीतून दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. लोहमार्ग पोलिस दलाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चोरट्याला पकडण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या होत्या. पोालिसांच्या पथकाने तपास करून लुभाणाला तुर्भे रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावून पकडले. चौकशीत त्याने रेल्वे प्रवाशात लोणावळा, खंडाळा परिसरात रेल्वे प्रवासी महिलांच्या पिशवीतून दागिने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. लुभाणाकडून दोन लाख 17 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांच्या पिशवीतून लॅपटॉप चोरीला गेले होते. तपास पथकाने सापळा लावून रेट्टामलाईला पकडले. त्याच्याकडून तीन लाख 13 हजार रुपयांचे चार लॅपटॉप जप्त करण्यात आले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक इरफान शेख, सहायक निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, सुहास माळवदकर, सुनील माने, अमरदीप साळुंके, संतोष जगताप, इम्तियाज आवटी, शिवाजी सावंत आदींनी ही कारवाई केली.

Back to top button