“भाजपसोबत गेलो तरी मूळ भूमिका कायम” ; राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण | पुढारी

"भाजपसोबत गेलो तरी मूळ भूमिका कायम" ; राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विकासासाठी आम्ही भाजप – शिवसेना महायुतीसोबत सत्तेमध्ये गेलो आहोत. आम्ही जरी भाजपसोबत गेलो असलो तरी आम्ही आमची फुले, शाहू, आंबेडकरांची धर्मनिरपेक्षतेची भूमिका सोडलेली नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रदेश सदस्य दत्तात्रय धनकवडे उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगाने विकास होत आहे. त्यामुळे आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातील महायुतीच्या सरकारमधील समन्वयासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेली समन्वय समिती स्थापन केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणी सुरू केली आहे. पुण्याच्या कार्यकारिणीच्या नियुक्तीपासून सुरुवात करण्यात आली असून, लवकरच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली विभागवार नियुक्त्या आणि बैठकांचे आयोजन करण्याचे वेळापत्रक तयार केले आहे.’

राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी देखील पुणे लोकसभेची जागा मागितली आहे. तसेच महापौरपदही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, असा दावा केला आहे. याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अगोदर होणार असून, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. तिन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबद्दल निर्णय घेतला जाईल. त्यानंतर महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने त्यावेळीदेखील घटक पक्षांच्या बैठकीत निर्णय होईल, त्यानुसार जागा व पदांचे वाटप होईल, असे उत्तर देत तटकरे यांनी पुणे लोकसभा आणि महापौरपदाच्या प्रश्नाला बगल दिली.

महापालिकेच्या निवडणुका 2024 मध्ये दिवाळीनंतर!
महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढविण्याबाबत स्पष्टीकरण देताना सुनील तटकरे यांनी अगोदर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होईल. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे प्रशासकराज असलेल्या बहुतांश महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका पुढीलवर्षी अर्थात 2024 मध्ये दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता वाढली आहे.

शरद पवारांचा फोटो वापरण्याबाबत निर्णय घेऊ
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत त्यांच्या फोटोचा वापर करू नये अथवा न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला आहे. या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले, ‘पवार साहेब आमचे दैवत आहे. परंतु त्यांनी फोटो वापरण्याबाबत केलेल्या विधानावर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.’

बीडमध्ये 27 ऑगस्टला सभा
आम्ही पक्षबांधणीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 27 ऑगस्ट रोजी बीड येथे सभा होणार आहे. ही सभा कोणाच्याही सभेला उत्तर देण्यासाठी आयोजित केलेली नाही, असेही स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले.

Back to top button