पावसामुळे बाजारातील उलाढाल मंदावली | पुढारी

पावसामुळे बाजारातील उलाढाल मंदावली

सुभाष किवडे

पुणे : सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या आठवड्यात येथील घाऊक बाजारातील उलाढाल मंदावली होती. मालाची आवक जावक कमी प्रमाणात असल्यामुळे खाद्यतेले, डाळी-कडधान्यांसह बहुतांशी जिनसांचे दर स्थिर होते. तूरडाळीचे दर पुन्हा 200 ते 300 रुपयांनी, तर मिलबर गव्हाचे दर 50 ते 75 रुपयांनी,तर आटा, रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली. तुटवड्यामुळे काबुली हरभर्‍याचे दरही कडाडले आहेत.

गेल्या आठवड्याच्या शेवटी ऑगस्ट महिन्याचा साखरेचा कोटा खुला करण्यात आला. एकूण 23.50 लाख टनाचा कोटा देण्याबरोबरच मागील महिन्यासाठी जाहीर झालेल्या कोटयापैकी विक्री न झालेल्या कोटयास मुदतवाढही देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सणासुदींना प्रारंभ होत असल्यामुळे यापुढे साखरेचा खप वाढता राहील, यामुळे तुटवडा निर्माण होऊन भाववाढ होऊ नये याकरिता मुबलक कोटा जाहीर करण्यात आला आहे. पुढील काळात मागणी पुरवठा कसा राहील, यावरच भावपातळी टिकून राहील, असा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात आवक जावक साधारण असल्यामुळे साखरेच्या दरात कोणताही विशेष फेरबदल आढळला नाही. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 3775 ते 3825 रुपये होता. मागणी पुरवठा साधारण असल्यामुळे सर्व प्रकारच्या गुळाचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

तुरडाळ, काबुली चणा महागला
आवक आवक कमी असल्यामुळे तुरडाळीच्या दरात क्विंटलमागे पुन्हा 200 ते 300 रुपयांनी वाढ होऊन दर पुन्हा पूर्वपदावर आले. मात्र अन्य डाळींचे दर स्थिर होते. निर्यात मोठया प्रमाणात होत असल्यामुळे भारी प्रतीच्या काबुली हरभर्याचा तुटवडा निर्माण झाला असून दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवडयातही दरात क्विंटलमागे एक सुमारे एक हजार रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
आवक कमी असल्यामुळे मिलबर गव्हाच्या दरात क्विंटलमागे 50 ते 75 रुपयांनी वाढ झाली. यामुळे आटा, रवा आणि मैद्याच्या दरातही 50 किलोमागे 4्र0 ते 50 रुपयांनी वाढ झाली. मात्र मागणी कमी असल्यामुळे इतर जातीचा गहू, ज्वारी तसेच बाजरीचे दर स्थिर होते. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर भारताने बंदी घातल्यानंतर अमेरिका, युरोप व अन्य देशात तांदळाचे दर कडाडले आहेत. अमेरिकेने ही बंदी उइविण्याबाबत भारतावर दबाव वाढविला आहे. यामुळे लवकरच ही बंदी उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवक जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवडयात येथील घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या तांदळाचे दर स्थिर होते. सततच्या पावसामुळे बाजारात आवक कमी प्रमाणात होत असून मागणीही बेताचीच असल्याचे सांगण्यात आले.

पावसामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी आहे. यामुळे खाद्यतेलांसही उठाव कमी असून सर्व प्रकारच्या खाद्यतेलांचे दर टिकून होते. मात्र खोबरेल तेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे पन्नास रुपयांनी वाढ झाली.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3775 ते 3825 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर): शेंगदाणा तेल 2800-2900, रिफाईंड तेलः 2550-3250, सरकी तेल 510-1800, सोयाबीन तेल 1500-1700, पामतेल 1400-1600, सूर्यफूल रिफाईंड तेल 1500-1700, वनस्पती तूप 1530-2000, खोबरेल तेल 2150-2200 रु. तांदूळ :- गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3500, सोनामसूरी 4000-4500, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 8000-8500, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर 2750 रु. ज्वारी :- गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दूरी 3800- 4200 रु. बाजरी :- महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु. गूळ: गूळ एकस्ट्रा 4150-4350, गूळ नं. 1 4000-4100, गूळ नं. 2 3850-3950, गूळ नं.3 3700-3825 बॉक्स पॅकिंग 3700-4800 रु. डाळी :- तूरडाळ 13000-14500, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7100- 7200, मटकीडाळ 9800-1000, उडीदडाळ 9500-11100 रु.

कडधान्ये: हरभरा 5500-5700, हुलगा-9000-10000 चवळी 7000-15000, मसूर 6500-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 8000-8200, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-12000, वाटाणा हिरवा 7000-7200, वाटाणा पांढरा 5200-5500, काबुली चणा 12000-16000 रु. साबुदाणा :- साबुदाणा नं.1 8000, साबुदाणा नं.2 7500, साबुदाणा नं. 3 7200 रु.

वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1000-1100 रु. शेंगदाणा : जाडा 13200-13700, स्पॅनिश – 12500-13000 घुंगरु 12500 रु. धने :- गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4100-4600, पेण 3700-4100, मध्यम पोहा-3900-4100, दगडी पोहा 4000-4800, पातळ पोहा 4800-5400, सुपर पोहा 4600-4900, भाजका पोहा 575-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3400, मुरमुरा (9 किलोस) 525-550, भडंग 850-900, घोटी 530,सुरती 550 रु.

रवा, मैदा, आटा :(50 किलोचा भाव) आटा 1500-1550, रवा 1550-1600, मैदा 1550-1600, बेसन : (50 किलोस) 3450-3750 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 250, मीठ दळलेले (50 किलोस) 270 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 5000-5500, लवंगी तेजा 25000-26000, गुंटूर 24000-25000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु.
नारळ : (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400-1450, सापसोल 2000-2500 रु.

 

Back to top button