पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलाचा ‘निकाह’ | पुढारी

पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलाचा ‘निकाह’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  बनावट कागदपत्रं तयार करीत अल्पवयीन मुस्लिम मुलाशी हिंदू मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवडगावात उघडकीस आला आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर संबंधित मुलगा त्याच्या कुटुंबीयासह या प्रकरणात आर्थिक आणि अन्य मदत करणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. चिंचवडगावातील व्यापारी कुटुंबातील मुलगी येथीलच एका शाळेत 2020 साली शिक्षण घेत होती. तेव्हा आरोपींपैकी मेहबूब लियाकत शेख नामक व्यक्तीने तिला फूस लावण्यासाठी संबंधित मुलाला आर्थिक ताकद दिली.

20 जून 2020 मध्ये तक्रार व्यक्तीच्या मुलीला पळवून नेण्यात आले. विशेष म्हणजे याबाबत तिचे अपहरण झाल्याची तक्रार वडील देत असताना चिंचवड पोलिसांनी तसा गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचे आत्ता चिंचवड पोलिसांनीच दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद केले आहे. मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे निकाहनामा केल्याचे तक्रारदार यांना समजले होते. त्यामुळे मुलीचे वडील संबंधित मुलाच्या घरी गेले असता, मुलीला अन्यत्र ठेवल्याचे समजले. तसेच मुलाचे वय कमी असल्याने बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, खोटे मुद्रांक, खोटा निकाहनामा आणि खोट्या सह्या करून मुलगा 21 वर्षांचा नसताना त्याचे हिंदू मुलीशी लग्न लावून दिले, असे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.

Back to top button