आकुर्डीत पालखी सोहळ्याची तयारी | पुढारी

आकुर्डीत पालखी सोहळ्याची तयारी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दिंड्या शहरात दाखल होतात. हा पालखी सोहळा वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात विसावा घेतो. शहरात पुन्हा वैभवशाली पालखी सोहळा होणार असल्याने आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात वारकर्‍यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. आकुर्डीतील विठ्ठल मंदिर हे वतनवारी पद्धतीने कुटे कुटुंबीयांकडे आले आहे. हे शिवकालीन मंदिर असून, यंदाचा 337 वा पालखी सोहळा आहे. संत तुकाराम महाराज पायी वारी करत त्या वेळी पहिला मुक्काम याठिकाणी करत होते. त्यामुळे पालखीचा मुक्काम परंपरेप्रमाणे याठिकाणी असतो. वारकर्‍यांच्या सेवेसाठी कुटे कुटुंबीयच नाही, तर शहर पसिरातील सर्व नागरिकांचा सहभाग असतो.

पालखी सोहळ्यासाठी महापालिकेकडून मंदिर व परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मंदिराच्या शेजारी मोठे शेड बांधले आहे. त्यामध्ये दर्शनरांग तयार केली आहे. तसेच स्वतंत्र खोल्यांचीदेखील व्यवस्था आहे. दरवर्षी ठरल्याप्रमाणे शहरवासीयांच्या घरी विसावा घेतात. शहरवासीयदेखील वारकर्‍यांची मनोभावे सेवा करतात. तसेच नेहमीप्रमाणे मनपा शाळांमध्येदेखील काही वारकर्‍यांची राहण्याची व्यवस्था केली जाते.

मंदिरामध्ये पालिकेकडून 32 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पालखी आल्यानंतर विसाव्यासाठी मंदिर परिसरात मोठा मंडप बांधण्यात आला आहे. तसेच मंडपात सुरक्षेसाठी पोलिस कक्ष तयार केला आहे. वारी आल्यानंतर सायंकाळी सात वाजता विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त गोपाळ कुटे यांच्या हस्ते आरती केली जाते. दरवर्षी कुटे कुटुंबीयांकडून वारकर्‍यांना महाप्रसादाची सोय असते. रात्री अकरा वाजता, दोन वाजता आणि पहाटे चार वाजता आरती केली जाते. त्यानंतर पालखी मार्गस्थ होते. ज्या दिवशी पालखी येणार आहे त्या दिवसापासून ते पालखी मार्गस्थ होईपर्यंत महापालिकेकडून आकुर्डी परिसरात सलग पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय असेल.

 

Back to top button