राज्यातील शाळांची दहावीत गुणवत्ता घटली ! | पुढारी

राज्यातील शाळांची दहावीत गुणवत्ता घटली !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या वर्षी 12 हजार 210 शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला होता. यंदा मात्र केवळ 6 हजार 844 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गेल्या वर्षी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण 83 हजार 60 विद्यार्थ्यांना मिळाले होते, तर यंदा केवळ 66 हजार 578 विद्यार्थ्यांना हे यश मिळविता आले आहे. 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षी 6 लाख 50 हजार 779 होती, तर यंदा केवळ 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थ्यांना हा पल्ला गाठता आला. त्यामुळे एकीकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा टक्का घटलेला असताना दुसरीकडे शतप्रतिशत निकाल देणार्‍या शाळांचा टक्कादेखील घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य मंडळाने 2 ते 25 मार्चदरम्यान दहावीची लेखी परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेतली. गेल्या अनेक वर्षांमध्ये यंदा पहिल्यांदाच दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 2 जून) राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निकाल जाहीर केला. या वेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचा दहावीचा निकाल यंदा 93.83 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के, तर नागपूर विभागाचा सर्वांत कमी 92.05 टक्के निकाल लागला आहे. पुणे विभागाचा निकाल यंदा 95.64 टक्के आहे. गेल्या वर्षी 122 विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले होते. या वर्षी 151 विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले आहेत, तर 66 हजार 578 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3.11 टक्क्यांनी निकाल घटला आहे.

नऊ विभागीय मंडळांमध्ये परीक्षेसाठी 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 94 हजार 198 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यंदाही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, मुलांपेक्षा त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 3.82 टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागाखालोखाल कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नाशिक विभागाने बाजी मारली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली ‘शाळा तेथे परीक्षा केंद्र’ तसेच 75 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा, या सुविधा यंदा रद्द करून 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांना बाहेरच्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागली. त्याचा थेट परिणाम निकालावर झाला असून, निकालाचा टक्का तर घटलाच; शिवाय 90 तसेच 75 टक्क्यांहून अधिक गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. यंदा 1 लाख 73 हजार 586 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले. एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. तरीदेखील दहावीच्या एकूण निकालात यंदा विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षणीय घटल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

या संकेतस्थळावर अतिरिक्त माहिती

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार असून, निकालाबाबतचा अन्य तपशील उपलब्ध होईल.

परीक्षेत 366 गैरप्रकारांची नोंद

राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा अनेक कडक उपाययोजना केल्या होत्या. यामध्ये प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणार्‍या ‘रनर’वर ‘जीपीएस’व्दारे लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच बैठे आणि भरारी पथकाच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच शाळांवर लक्ष ठेवण्यात आले. तरीदेखील परीक्षेदरम्यान 366 गैरप्रकार झाले. यामध्ये 166 कॉपीचे प्रकार, विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान साहाय्य करण्याचे 2 प्रकार, तर परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांच्या माध्यमातून घडलेल्या 248 गैरप्रकारांचा समावेश असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

गुणपडताळणीही करता येणार

निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयांतील गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पध्दतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येईल. हा अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http:// verification. mh- ssc. ac. यावर करता येईल. गुणपडताळणीसाठी 3 ते 12 जूनपर्यंत अर्ज करता येईल. तर छायाप्रतीसाठी 3 ते 22 जूनपर्यंत अर्ज ऑनलाइन पध्दतीने करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना 14 जूनला मिळणार गुणपत्रिका

मार्च 2023 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत 14 जून रोजी दुपारी 3 वाजता वितरित करण्यात येणार आहेत.

पुरवणी परीक्षेसाठी 7 जूनपासून नोंदणी

पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी
जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जूनपासून सुरू होणार आहे.

आकडे काय सांगतात..?

नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी : 15 लाख 41 हजार 666
प्रविष्ट झालेले विद्यार्थी : 15 लाख 29 हजार 96
उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी : 14 लाख 34 हजार 898
अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी : 94 हजार 198
उत्तीर्ण मुलांचा निकाल : 92.05 टक्के
उत्तीर्ण मुलींचा निकाल : 95.87 टक्के
प्रविष्ट झालेले पुनर्परीक्षार्थी : 36 हजार 648
उत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी : 22 हजार 320 (60.90 टक्के)
खासगीरीत्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी : 20 हजार 574
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : 15 हजार 277
कलागुणांचा लाभ मिळालेले : 1 लाख 73 हजार 586
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल : 92.49 टक्के
परीक्षेसाठीचे उपलब्ध विषय : 67
25 विषयांचा निकाल : 100 टक्के
शून्य टक्के निकालाच्या शाळा : 43
निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी : 95
100 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी : 151
90 टक्यांहून अधिक गुण : 66 हजार 578
विशेष प्रावीण्यासह 75 टक्यांहून अधिक गुण
मिळविणारे : 4 लाख 89 हजार 455
प्रथम श्रेणीसह 60 टक्क्यांहून अधिक गुण
मिळविणारे : 5 लाख 26 हजार 210

विभागीय मंडळनिहाय निकाल

पुणे : 95.64 टक्के
नागपूर : 92.05 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
कोकण : 98.11 टक्के
एकूण निकाल : 93.83 टक्के

गेल्या पाच वर्षांतील निकाल

2023 : 93.83 टक्के
2022 : 96.94 टक्के
2021 : 99.95 टक्के
2020 : 95.30 टक्के
2019 : 77.10 टक्के

या संकेतस्थळांवर निकाल

ww.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप होऊनही नियोजित वेळेपेक्षा अगोदर दहावीचा निकाल जाहीर करण्याचे काम यंदा राज्य मंडळाने केले आहे. गेल्या अनेक वर्षांचा विचार करता यंदा पहिल्यांदाच जूनच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी शाळा तेथे परीक्षा केंद्र होते, तर यंदा बाहेरच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होती. त्यामुळे 100 टक्के निकाल देणार्‍या शाळा घटल्या आहेत, तरी तुलनात्मकदृष्ट्या शाळांचा निकाल चांगलाच आहे.

– शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Back to top button