पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर पाचवेळा 15 मिनिटांचा ब्लॉक | पुढारी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर पाचवेळा 15 मिनिटांचा ब्लॉक

प्रसाद जगताप

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वीकेंडला मुंबईहून बाहेर पडणार्‍या आणि पुण्याहून मुंबईला जाणार्‍या वाहनांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्या पार्श्वभूमीवर ठोस उपायोजना करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी यावर तोडगा काढला आहे.

महामार्ग पोलिसांकडून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) शनिवारी आणि रविवारी दिवसातून पाच वेळा ठिकठिकाणी ब्लॉक घेण्यात येत आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना अतिरिक्त लेन उपलब्ध करून दिली जात आहे. या ब्लॉकमध्ये एका बाजूने होणारी वाहतूक काही वेळ थांबवून दुसर्‍या बाजूने येणार्‍या वाहनांना रस्ता देण्यात येत आहे. त्यामुळे महामार्गावर होणारी कोंडी सुटण्यास मदत होत आहे.

पुणे-मुंबईदरम्यान वीकेंडला प्रवास करताना वाहनचालकांच्या नेहमीच नाकीनऊ येत असते. त्यातच महामार्ग पोलिसांकडून करण्यात येणार्‍या या उपाययोजनांमुळे वाहनचालकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. रवींदर सिंगल यांच्यासह महामार्ग पोलिसांच्या या कामाचे कौतुक केले आहे. तसेच, डॉ. सिंगल यांनी घाट रस्त्यावर येणार्‍या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणीही केली आहे.

शनिवारी, रविवारी असे आहे नियोजन

पुणे लेनला 44-100 किलोमीटर जवळ एक कट आहे तेथून वाहने मुंबई लेनला डायव्हर्ट केली जातात. त्याच वेळी मुंबई लेनने येणारी वाहतूक 15 मिनिटे खंडाळा टनेल जवळ थांबविली जाते. मग खंडाळा टनेलजवळ 46-800 किमी येथे डायव्हर्ट केलेली वाहतूक पुन्हा पुणे लेनला जोडली जाते. या वेळी 1200 ते 1500 चारचाकी गाड्या पास होतात. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यात महामार्ग पोलिसांना यश आले आहे. तसेच, मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना 42-48 किलोमीटरदरम्यान कोंडी होते. त्यासोबतच अमृतांजन पुलाजवळील चढावर वाहतूक कोंडी होते, तेथेही कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. हे ब्लॉकचे नियोजन वाहनांच्या फ्लोनुसार महामार्ग पोलिसांकडून केले जाते.

अवजड वाहनांचा पार्किंग अवर

रस्त्यावर होणार्‍या अपघातातील गोल्डन अवरप्रमाणे महामार्ग पोलिसांनी ‘पार्किंग अवर’ चे नियोजन केले आहे. त्यानुसार रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यात सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत अवजड वाहने थांबविली जात आहेत. हा ‘पार्किंग अवर’ फक्त वीकेंडच्या दिवशीच केला जात असल्याचे महामार्ग पोलिसांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

वाहनचालकांकडून नियम धाब्यावर

  • लेन शिस्तीचे पालन नाही
  • प्रमाणापेक्षा अधिक वाहनांचा वेग अधिक
  • विरुद्ध दिशेने (नो-एन्ट्री)
  • वाहन चालविणे
  • क्रॅशबॅरिअर तोडून एक्स्प्रेस वेवर घुसखोरी करणे
  • एसटी गाड्यांकडूनही लेन शिस्तीकडे दुर्लक्ष
  • एक्स्प्रेस रस्त्यालगत पार्किंग

सुटीच्या दिवशी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी कोंडी असते. ती सोडविण्यासाठी पुण्याच्या दिशेला अतिरिक्त लेन उपलब्ध करून दिली आहे. अवजड वाहतूक सुरळीत होण्यासाठी दिवसातून पाच ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतात. त्यामुळे कोंडी सुटण्यास मदत होत आहे.

     – डॉ. रवींदर सिंगल, अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य

Back to top button