पुणे शहरातील सिग्नल सिंक्रोनाईज यंत्रणेने टाकली मान | पुढारी

पुणे शहरातील सिग्नल सिंक्रोनाईज यंत्रणेने टाकली मान

हिरा सरवदे

पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटीच्या सहकार्याने शहरातील विविध चौकांमध्ये कार्यान्वित केलेली सिंक्रोनाईज सिग्नल व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना चौकाचौकांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शहरातील विविध रस्ते आणि चौकांमधील वाहतुकीचे नियमन वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून केले जाते. मात्र, रस्ते, चौक आणि सिग्नल आदी व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील 277 लहान-मोठ्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविली आहे. शहरातील विविध रस्त्यांवर बसविलेले सिग्नल हे वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत.

त्यामुळे विविध चौकांत हिरव्या सिग्नलचा वेळ कमी-जास्त आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या सकाळी आणि सायंकाळच्या वेळी जास्त असते. अशा वेळी एका सिग्नलवरून पुढे गेलेले वाहन दुसर्‍या चौकातील सिग्नलवर थांबते. परिणामी, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर शहरातील रस्त्यांवरील सिग्नल सिंक्रोनाईज करण्याचा प्रकल्प स्मार्ट सिटीच्या सहकार्याने हाती घेतला होता.

पहिल्या टप्प्यात चतु:श्रृंगी मंदिर ते प्रभात रोड, टिळक चौक (अलका टॉकीज) ते नाथ पै चौक (शास्त्री रोड), गुंजन चौक ते विमाननगर, आंबेडकर चौक ते बोल्हाई चौक आणि संचेती चौक ते अलका टॉकिज चौक या दरम्यान येणारे सिग्नल सिंक्रोनाईज करण्यात आले होते. एकाच दिशेने जाणार्‍या वाहनांना एकापाठोपाठ सिग्नल मिळत गेल्याने वाहनचालकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होत होती.

शिवाय एक सिग्नल तोडला, तरी पुढच्या सिग्नलला थांबावे लागणार होते. त्यामुळे सिग्नल तोडण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते. शहरातील इतर रस्त्यांवरीलही सिग्नल सिंक्रोनाईज करण्यात येणार होते. मात्र, पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या रस्त्यावरील ही यंत्रणा काही महिने चालल्यानंतर मागील अनेक महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुन्हा एकदा चौकाचौकांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

नवीन एटीएमएसमुळे जुन्या यंत्रणेकडे दुर्लक्ष

महापालिका, वाहतूक पोलिस आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संयुक्तपणे शहरातील प्रमुख 110 चौकांमध्ये अत्याधुनिक अशी एटीएमएस सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात कर्वे पुतळा, कर्वे रस्ता, टिळक टौक, टिळक रस्ता, स्वारगेट, शंकरशेठ रस्ता, फातिमा नगर, बी.टी. कवडे चौक या मार्गावरील 30 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रशासनाकडून एटीएमएस सिग्नल यंत्रणा बसविण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पूर्वी बसविलेल्या सिग्नल सिंक्रोनाईज यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विकासकामांमुळे सिग्नल विस्कळीत

शहरातील विविध रस्त्यांवर विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. या कामांमुळे काही चौकांमधील सिग्नल व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यात सिंक्रोनाईज केलेल्या सिग्नलचाही समावेश आहे. दोन दिवसांत जुन्या सिंक्रोनाईज सिग्नलचा आढावा घेऊन बंद असलेली यंत्रणा सुरू करण्यात येईल.

                – श्रीनिवास कंदुल, अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग.

Back to top button