आंबेगाव तालुक्यातील वाघदरा डोंगराला वणवा; वनसंपत्तीचे मोठे नुकसान | पुढारी

आंबेगाव तालुक्यातील वाघदरा डोंगराला वणवा; वनसंपत्तीचे मोठे नुकसान

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक-गावडेवाडी हद्दीच्या डोंगराला शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी वणवा लागला. यामध्ये सुमारे पाच ते सहा हेक्टर भागातील जंगलसंपत्तीचे नुकसान झाले. सुमारे पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर संपूर्ण आग नियंत्रणात आणण्यात वन खाते व बिबट रेस्क्यू टीमला यश आहे.

अवसरी बुद्रुक व गावडेवाडी हद्दीवर वाघदरा डोंगरावर शुक्रवारी अचानक वणवा लागला. वणव्याचे कारण अद्याप समजले नसून दिवसभर असणार्‍या जोरदार वार्‍यामुळे आगीचे लोळ उठत होते. सायंकाळी सात-साडेसात वाजेपर्यंत उजेड असल्यामुळे वणवा लागल्याचे निदर्शनात आले नाही;

मात्र रात्री उशिरा 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना लक्षात आल्यानंतर वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, वनरक्षक शिवशरण तसेच वनमजूर अरुण खंडागळे, बिबट रेस्क्यू टीमचे मनोज तळेकर, मिलिंद टेमकर, रमेश गावडे , सुधीर हिंगे यांच्या मदतीने अखेर संपूर्ण वणवा रात्री साडेअकराच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आला. या वणव्यामुळे डोंगरावरील अनेक झाडेझुडपे, छोटे पशुपक्षी यांची घरटी जळून खाक झाली आहेत.

Back to top button