पिंपरी : वीज गेल्याने साडेतीन लाख ग्राहकांना फटका | पुढारी

पिंपरी : वीज गेल्याने साडेतीन लाख ग्राहकांना फटका

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि.18) सायंकाळी 7.10 ला अचानक तांत्रिक बिघाड झाला. या पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून बेजबाबदारीचा कळस झाल्यामुळे तब्बल साडेतीन लाख ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ आली. अदानी कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

गव्हाणे म्हणाले की, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुमारे 396 मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुण्यातील काही भागांसह पिंपरी-चिंचवड शहरातील निम्मा भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. अदानी कंपनीकडून तात्काळ दुरुस्ती करणे अपेक्षित असतानाही ती करण्यात न आल्यामुळे गुरुवारची संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारात काढावी लागली.

चाकण, तळेगाव आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 5 हजार कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जे नुकसान झाले त्याबाबत माहिती घेऊन झालेल्या नुकसानीची जबाबदारी अदानी कंपनीवर निश्चित करावी व ही रक्कम अदानी कंपनीकडून नुकसान झालेल्या कंपन्यांना अदा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Back to top button