ऑनलाइनमुळे चिरीमिरीला चाप | पुढारी

ऑनलाइनमुळे चिरीमिरीला चाप

संतोष शिंदे :

पिंपरी : वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसुलीसाठी अद्ययावत ई-चलान पद्धत सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे वाहतूक पोलिसांना रोकड स्वीकारण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. याचा चांगला परिणाम म्हणजे, वाहतूक विभागातील चिरीमिरीला चाप बसला आहे. मागील काही वर्षांपासून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांकडून ई-चलान प्रणालीद्वारे दंडाची आकारणी केली जात आहे. वाहतूक पोलिस नियम मोडणार्‍या वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र काढून ई- प्रणालीत टाकतात. त्या आधारे संबंधित वाहन चालकाला दंडाच्या रकमेचा ’एसएमएस’ नोंदणी असलेल्या मोबाईलवर जातो. संबंधित वाहन चालकाला त्या दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा वाहतूक पोलिसांकडील यंत्राद्वारे भरता येते.

यापूर्वी वाहतूक पोलिस वाहन चालकांकडून रक्कम स्वीकारत होते. मात्र, यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप झाले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केवळ ऑनलाइन दंडच घ्यावा, असे आदेश घटकप्रमुखांकडून करण्यात आले. ऑनलाइनच्या वाढत्या वापरामुळे चिरीमिरी घेणार्‍या वाहतूक पोलिसांची मोठी अडचण झाल्याचे चित्र आहे.

 

Back to top button