स्मार्ट सिटीत ऑनलाइन मिळकतकर, पाणीपट्टी भरण्यास वाढती पसंती | पुढारी

स्मार्ट सिटीत ऑनलाइन मिळकतकर, पाणीपट्टी भरण्यास वाढती पसंती

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत ऑनलाइन मिळकतकर, पाणीपट्टी भरण्यास मोठी पसंत दिली जात आहे. ऑनलाइन व्यवहार सुरक्षित व सुलभ असल्याने नागरिकांकडून पालिकेची बिले ऑनलाइनद्वारे भरण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कार्यालयात जाण्याचा वेळ व प्रवाशांचा खर्च वाचत आहे. दुसरीकडे, महापालिकेचे उत्पन्न वाढत आहे. ऑनलाइन व्यवहारात सुटसुटीतपणा आल्याने नागरिक ऑनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहे. चहाच्या बिलापासून दरमहिन्यांची विविध बिले ऑनलाईन अदा केली जात आहेत. त्यामुळे दंड व कारवाईची भीती राहत नाही.

काही मिनिटात ही प्रक्रिया पार पडत असल्याने घरबसल्या बिल केव्हाही आणि कधीही भरले जात आहे. त्यामुळे पालिकेच्या कार्यालयात ठराविक वेळेत जाऊन रांगेत उभे राहण्याचे, प्रवास व सुट्टया पैश्यांच्या कटकटीतून नागरिकांची सुटका झाली आहे. तसेच, ऑनलाइन बिल भरल्यास सामान्यकरात 5 टक्के सवलतीचा लाभ घेतला जात आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत 4 लाख 13 हजार 842 पैकी 2 लाख 59 हजार नागरिकांनी 816 कोटी 67 लाखांपैकी एकूण 389 कोटी 15 लाखांचा ऑनलाइन माध्यमातून घर बसल्या स्मार्ट मोबाईल किंवा संगणकावरून मिळकतकरांची बिले भरली आहे. हे प्रमाण तब्बल 48 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच, पाणीपट्टी बिलेही मोठ्या संख्येने ऑनलाइन भरली जात आहेत.

त्यामुळे संबंधित क्षेत्रीय कार्यालयात चक्करा मारण्याचा ताप वाचला आहे. गेल्या दहा वर्षांत ऑनलाइन बिले भरण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण लक्षात घेऊन कर संकलन, पाणीपुरवठा व बांधकाम परवानगी आणि इतर विभागाने शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, इतर अनेक सेवा व सुविधा ऑनलाइन देण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ नागरिक घेत आहेत. त्यामुळे रोख, धनादेश व डीडीद्वारे बिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे.

सन 2022-23 मध्ये  ऑनलाइन मिळकतकर भरणा मिळकतधारक 2 लाख 59 हजार
भरणा
389 कोटी

Back to top button