पुणे जिल्ह्यात ग्राहकांना अद्यापही गावरान आंब्याची प्रतीक्षाच | पुढारी

पुणे जिल्ह्यात ग्राहकांना अद्यापही गावरान आंब्याची प्रतीक्षाच

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उत्तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या वर्षी गावरान आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात केशर व इतर काही संकरित जातीच्या आंब्यांचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडले आहेत. यंदा गावरान मधुर आमरसाची चव अद्यापही सर्वसामान्यांना मिळेनाशी झाली आहे. ग्राहकांचा केशर, बदाम व हापूसकडे जास्तीचा कल दिसून येतो.

उन्हाळ्यात मे महिन्याच्या प्रारंभीच नैसर्गिकरीत्या पिकविलेले गावरान आंबे उपलब्ध होत असतात. परंतु, या वर्षी अर्धा मे महिना संपला, तरीही अद्याप गावरान आंबे बाजारात दिसत नाहीत. परिणामी, इतर आंब्यांना मागणी वाढती आहे. सध्या बाजारात केशर, दशहरी, सुंदरी, महेमुदा, तोतापुरी आदी संकरित प्रजातींचे आंबे आढळत आहेत. परंतु, या संकरित आंब्यांचा दर हा सामान्यांना परवडणारा नसल्याने सामान्य कुटुंबीयांना अद्यापही आमरस खाण्यासाठी गावरान आंब्याची प्रतीक्षा आहे.

अवकाळी पाऊस व वेळोवेळी होणार्‍या हवामानबदलाचा फटका, वादळी पाऊस याचा परिणाम गावरान आंब्याला बसला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी गावरान आंब्याच्या उत्पादनात 80 टक्क्यांपेक्षा अधिक घट येण्याचा अंदाज प्रारंभीच येत होता. त्यामुळे यंदा गावरान आंब्याचा रस सर्वसामान्यांसाठी आंबटच ठरण्याची शक्यता दिसून येत आहे.

आंब्याच्या झाडांची तोड

ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी हा नगदी पिके घेण्याकडे वळू लागल्याने गावरान आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. तसेच विविध कारणांमुळे आंब्याच्या झाडांची तोड झाल्याने जुन्नर तालुक्यातील गावरान आंब्याच्या झाडांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच राहिली आहे. गावरान आंबा, चवदार-गोड आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकारक मानला जातो.

Back to top button