पुणे जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांसाठी आज होणार मतदान | पुढारी

पुणे जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांसाठी आज होणार मतदान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि.28) मतदान होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पुणे, तळेगाव दाभाडे (मावळ), मंचर (आंबेगाव), भोर, निरा (पुरंदर), खेड, इंदापूर, दौंड आणि बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. नऊ बाजार समित्यांच्या प्रत्येकी 18 जागांसाठी एकूण 357 उमेदवार रिंगणात आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर एकूण 18 संचालक निवडून दिले जातात.

त्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून एकूण 11 संचालक निवडून येतात. त्यापैकी सर्वसाधारण गटातून 7, महिला राखीव 2, इतर मागासवर्गीय 1, विमुक्त जाती, भटक्या जमाती 1 मिळून एकूण अकरा संचालकांचा समावेश आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून 4 संचालक निवडून दिले जातात. त्यामध्ये सर्वसाधारण गटातून 2, अनुसूचित जाती, जमातीमधून 1 व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून 1 अशा चार जागांचा समावेश आहे.

व्यापारी-अडते मतदारसंघातून 2 संचालक आणि हमाल-मापाडी मतदारसंघातून 1 मिळून एकूण 18 संचालक बाजार समित्यांवर निवडून दिले जातात. जुन्नर बाजार समितीसाठी रविवारी मतदान होत आहे. या समितीत 18 जागांसाठी एकूण 41 उमेदवार रिंगणात आहेत. तर जिल्ह्यातील एकूण 10 बाजार समित्यांचा विचार करता विकास सोसायटी मतदारसंघात 244 उमेदवार, ग्रामपंचायत मतदारसंघात 93 उमेदवार, अडते-व्यापारी मतदारसंघात 41 आणि हमाल-तोलणार मतदारसंघात 20 मिळून एकूण 398 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) कार्यालयातून देण्यात आली.

या समित्यांची मतमोजणी आजच

भोर व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान आणि मतमोजणी शुक्रवारीच (दि.28) होत आहे. त्यामध्ये भोर बाजार समितीचे मतदान सकाळी 9 ते 4 या वेळात होऊन त्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होणार आहे. तसेच खेड बाजार समितीचे मतदानही शुक्रवारी 8 ते 4 या वेळात होऊन एक तासानंतर मतमोजणी होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांचा कौल लगेचच समजून कोणाचे वर्चस्व राहणार हेसुध्दा स्पष्ट होणार आहे.

जुन्नरचे 30 एप्रिलला मतदान

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 या वेळात मतदान होणार असून, मतदान संपल्यानंतर एक तासानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे.

Back to top button