पुणे जिल्ह्यातील हवेलीत लसीकरण उघड्यावर; आरोग्यसेवा वार्‍यावर | पुढारी

पुणे जिल्ह्यातील हवेलीत लसीकरण उघड्यावर; आरोग्यसेवा वार्‍यावर

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  मोठा विस्तार असलेल्या हवेली तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा लाल फितीचा कारभार, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे वार्‍यावर आहे. तालुक्यातील 29 आरोग्य केंद्रांना इमारत नसून, जागा मिळेल तेथे उघड्यावर बालके व मातांचे लसीकरण होत आहे. उपकेंद्राच्या इमारतींसाठी शासन दरवर्षी निधी मंजूर करते. मात्र, कोणीही जागा बक्षीस देण्यासाठी पुढे येत नाही, असे चित्र 35 वर्षांपासून आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. डॉक्टर, कर्मचार्‍यांना गडगंज पगार, मोफत औषधे, रुग्णवाहिका आदी सेवा पुरवते. मात्र दुसरीकडे गोरगरिबांना वैद्यकीय सेवेसाठी वणवण करावी लागत आहे. ठराविक प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास सेवा आहे, मात्र, अनेक केंद्रात डॉक्टर, कर्मचारी मुक्कामी नसल्याने सेवा कोलमडली आहे.

काही उपकेंद्रात डॉक्टर, कर्मचारी मनमानीपणे येतात. गावातील आशा वर्कर्सला भेटून काही क्षणातच गायब होतात. अनेकजण महिनोन् महिने येतच नाहीत. काही उपकेंद्रात डॉक्टर, कर्मचार्‍यांची पदेही रिक्त आहेत. गोर्‍हे खुर्द उपकेंद्राला इमारत नाही, त्यामुळे अंगणवाडीत माता, बालकांना लसीकरण व इतर वैद्यकीय सेवा देत आहेत. मात्र, अपुर्‍या जागेमुळे डॉक्टर, कर्मचार्‍यांसह रुग्णांची गैरसोय होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात तिसर्‍या मजल्यावर खोली दिली आहे. मात्र, जिन्याने चढण्यासाठी गैरसोय होत असल्याने अंगणवाडीत लसीकरण करत असल्याचे गोर्‍हे खुर्द उपकेंद्राच्या डॉ. सना तांबोळी यांनी सांगितले.

उपकेंद्राची इमारत मंजूर आहे. मात्र, जागाच मिळत नाही. गोर्‍हे खुर्द, माताळेवाडी, डोणजे आदी ठिकाणीही अंगणवाडीत महिन्यात तीन वेळा गरोदर माता, बालकांचे लसीकरण होते, असेही त्या म्हणाल्या. खामगाव मावळ येथे उपकेंद्राच्या इमारतीसाठी अनेकदा निधी मंजूर झाला. मात्र, बक्षीस जागा मिळत नसल्याने निधी परत जातो. येथे ग्रामपंचायत कार्यालयातच उपकेंद्राचा कारभार चालत आहे. काही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे उपकेंद्राचे डॉ. योगेश पोकळे व कर्मचारी लसीकरणासाठी आले, मात्र ग्रामपंचायत कार्यालयाच्या कुलपाची चावी हरवल्याने व्हरांड्यातच लसीकरण करावे लागले. मात्र, खामगाव मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, माळवाडी, खरमरी आदी ठिकाणच्या बालकांसह मातांचे नियमितपणे लसीकरण करीत असल्याचे पोकळे म्हणाले.

आंबीत प्रशस्त इमारत; मात्र डॉक्टर नाही

आंबी येथे उपकेंद्रासाठी अडीच कोटी रुपये खर्च करून आलिशान इमारत उभारली आहे. मात्र, उपकेंद्रात डॉक्टरच नाहीत. एक कर्मचारी आहे. त्याही कधीतरी येतात. तरुण स्थलांतरित होत असल्याने गावात बालके, गरोदर मातांची संख्या कमी आहे. वयोवृद्ध महिला, पुरुषांची संख्या अधिक आहे.

 

Back to top button