दहावी-बारावीचे पेपर तपासणी अंतिम टप्प्यात; निकाल वेळेत जाहीर होणार | पुढारी

दहावी-बारावीचे पेपर तपासणी अंतिम टप्प्यात; निकाल वेळेत जाहीर होणार

 पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणी व मॉडरेशनचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल वेळेत लागणार आहेत. बारावीचा निकाल मेअखेरीस, तर दहावीचा निकाल जूनच्या दुसर्‍या आठवड्यात लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाली. या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. या परीक्षेसाठी 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी व मॉडरेशनचे कामकाज 17 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे.

दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी व मॉडरेशन कामकाजासाठी 15 एप्रिलची मुदत देण्यात आली होती. परंतु, काही उत्तरपत्रिका तपासणे बाकी आहे. त्यांचे काम देखील येत्या आठवडाभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतर निकाल बनविण्याचे काम वेगाने केले जाणार असल्याचे
राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी अंतिम टप्प्यात आहे. त्यासंदर्भातील योग्य नियोजन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात आढावा देखील घेण्यात येत असतो. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या संपाचा कोणताही परिणाम निकालावर होऊ न देता दहावी-बारावीचे निकाल वेळेतच लावण्यासाठी राज्य मंडळ प्रयत्नशील आहे.
                                           – शरद गोसावी, अध्यक्ष,
                         राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Back to top button