बारामतीत रंगणार जंगी कुस्त्यांचा थरार; 17 एप्रिल रोजी आयोजन | पुढारी

बारामतीत रंगणार जंगी कुस्त्यांचा थरार; 17 एप्रिल रोजी आयोजन

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने येथील शारदा प्रांगण येथे सोमवारी (दि. 17) दुपारी 2 वाजता आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांनी ही माहिती दिली. कुस्ती मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. कुस्ती आखाड्याचे उद्घाटन उद्योगपती श्रीनिवास पवार यांच्या हस्ते होईल.

या आखाड्यात देशात गाजत असलेला महाराष्ट्राचा सुपुत्र नामांकित मल्ल पै. सिकंदर शेख व इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल पै. अली इराणी यांच्यात प्रथम क्रमांकाची 5 लाख रुपये इनामाची निकाली कुस्ती होणार आहे. 3 लाख रुपये इनामाच्या कुस्तीत पै. शैलेश शेळके विरुद्ध पै. माऊली कोकाटे, मुंबई महापौर केसरी पै. भारत मदने विरुद्ध पै. गणेश जगताप, महाराष्ट्र केसरी पै. बालारफीक शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर असे विख्यात मल्ल एकमेकांना भिडणार आहेत.

25 पुरुस्कृत प्रेक्षणीय कुस्त्या आणि सुमारे 125 नेमलेल्या जंगी कुस्त्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 10 ते 12 हजार कुस्तीप्रेमी प्रेक्षक बसतील अशी गॅलरी उभारण्यात येणार असून, सर्व कुस्त्या जागेवर बसून पाहता येणार आहेत. प्रसिद्ध हलगीवादक राजू आवाळे ग्रुप आखाड्याची रंगत वाढविणार आहे. समालोचन प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकरअण्णा पुजारी, प्रशांत भागवत व युवराज केचे करणार आहेत.

आखाड्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, कुस्तीगीर संघाचे ज्येष्ठ व युवा सदस्य मैदान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. बारामतीत प्रथमच भव्य अशा आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार असून, राज्यातील कुस्तीप्रेमींनी कुस्त्या पाहण्यास उपस्थित राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले आहे.

Back to top button