पुणे: तब्बल १३ वर्षांपासून फरारी असलेला संशयित जेरबंद, नारायणगाव पोलिसांची कारवाई | पुढारी

पुणे: तब्बल १३ वर्षांपासून फरारी असलेला संशयित जेरबंद, नारायणगाव पोलिसांची कारवाई

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: मारहाणीच्या गुन्ह्यातील मागील १३ वर्षांपासून फरार असणाऱ्या संशयितास नारायणगाव पोलिसांच्या पथकाने सापळा लावून अटक केली. ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. धोंडीभाऊ रामा मेंगाळ (वय ३३, रा. जांबुत साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी अनेक दिवसांपासून फरार व पाहिजे असलेले संशयित यांना अटक करण्याबाबत सर्व पोलिस ठाण्यांना आदेशित केले होते. त्यानुसार नारायणगावचे प्रभारी अधिकारी ताटे यांनी त्यांच्या पथकाला याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आळेफाटा पोलिस ठाणे होण्यापूर्वी म्हणजे तब्बल १३ वर्षांपूर्वी नारायणगाव पोलिस ठाणे हद्दीतील आळेफाटा जवळील वरंडी गावात मारहाणीची घटना घडली होती. त्यातील ४ संशयित गजाआड झाले होते, तर पाचवा धोंडीभाऊ मेंगाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

दरम्यान मेंगाळ हा निमगाव सावा या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस नाईक दिनेश साबळे, पोलिस अंमलदार सचिन कोबल, शैलेश वाघमारे, पोलिस गोरक्ष हासे यांनी निमगाव सावा पेट्रोलपंप जवळ दिसला त्यास ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेष घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Back to top button