पिंपरी-चिंचवड शहरातील मालवाहतुकीतून एसटीला 3 महिन्यांत 7 लाख | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरातील मालवाहतुकीतून एसटीला 3 महिन्यांत 7 लाख

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वेगवेगळ्या योजनांद्वारे सर्वसामान्यांच्या मनात घर करू पाहत आहे. उपलब्ध खासगी सेवेहून अधिक तत्पर, सुरक्षित आणि माफक दरांमुळे एस.टी.ची मालवाहतूक सेवा चर्चेत आहे. मालवाहतुकीमधून नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत एसटीला 7 लाखांचे उत्पन्न मिळाले असून एसटीद्वारेच बालभारती प्रकाशनाची पुस्तके राज्यभर पाठविली जात आहेत.

औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारामधून मालवाहतूक सेवेद्वारे विविध कंपन्यांचे साहित्य, पुस्तके, घरसामान, सिमेंट इत्यादी साहित्याची वाहतूक राज्याच्या कानाकोपर्‍यात होत आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांचे एकूण उत्पन्न 6 लाख 92 हजार आहे. या कालावधीत मालवाहतूक एसटी सेवेच्या 60 फेर्‍या झाल्या असून, 11194 किमी अंतर पार केले आहे.

एप्रिल महिन्यात केवळ पाच दिवसांत पंधरा दिवसांचे उत्पन्न एसटीला मालवाहतुकीमधून प्राप्त झाले आहे. उन्हाळा सुरू झाला की, लग्न सराईतील वस्तूंची वाहतूक झाली आहे.

एसटीच्या तिजोरीत इतर उत्पन्नापैकी मालवाहतुकीमधून मिळणारे उत्पन्न सर्वाधिक आहे. राज्यभरात बालभारती पुस्तकांची वाहतूक केली जात आहे. आता घरसामान आणि इतर साहित्यांची वाहतूक वाढली आहे. खासगी सेवेहून अधिक तत्पर, सुरक्षित आणि माफक दरामुळे एसटीच्या मालवाहतूक सेवेला नागरिक प्राधान्य देत आहेत.
                  – विकास तुळे, मालवाहतूक प्रमुख, वल्लभनगर आगार, पिं. चिं. शहर

एसटीचे चालू वर्षातील (2023) मालवाहतूक उत्पन्न
महिना कि.मी. फेर्या उत्पन्न
जानेवारी 1849 14 1,11,164
फेब्रुवारी 2702 19 1,81,480
मार्च 5541 22 3,33,869
एप्रिल
5 दिवस 1102 5 65, 352
एकूण 11,194 60 6,91,865

 

Back to top button