मांस वाहतूक करणारे दोघे जाळ्यात; नगर- कल्याण महामार्गावर पोलिसांची कारवाई | पुढारी

मांस वाहतूक करणारे दोघे जाळ्यात; नगर- कल्याण महामार्गावर पोलिसांची कारवाई

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावर ओतूर हद्दीतील मोनिका चौकात ओतूर पोलिस रात्र गस्तीवर असताना नाकाबंदीदरम्यान त्यांनी जनावरांचे मांस असलेल्या टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओतूर येथील मोनिका चौकात टेम्पो (एमएच 03 सीव्ही 8216) जात होता. याला पोलिसांनी थांबविले.

या टेम्पोच्या मागील बंदिस्त असलेल्या भागात सुमारे 800 किलो जनावरांचे कत्तल केलेले मांस आढळून आले. पोलिसांनी गाडीतील चालक महंमद रिझवान फकीर महंमद कुरेशी (रा. कुर्ला पूर्व, मुंबई) व वाहक अलीम असिफ शेख (रा. गोवंडी, मुंबई) या दोघांना गाडीसह विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

या गुन्ह्यात सुमारे 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे कत्तल केलेल्या जनावरांचे मांस, 2 लाख 50 हजार रुपये किमतीची गाडी, असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे व सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ए. सी. केरुरकर, पोलिस जवान एम. एस. राठोड, पोलिस नाईक डी. आर. पालवे, एम. डी. बांबळे, अस्लम शेख आदींनी केली.

Back to top button