पिंपरी : धोकादायक इमारती पाडणार कधी? | पुढारी

पिंपरी : धोकादायक इमारती पाडणार कधी?

वर्षा कांबळे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची केशवनगर माध्यमिक शाळा व वाल्हेकरवाडी प्राथमिक शाळेच्या इमारती बांधकाम तपासणीमध्ये धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. शाळेला तात्पुरती पर्यायी जागा दिली असली तरी केशवनगर शाळेमध्ये जागेअभावी प्राथमिक विभागाचा वर्ग भरत आहे. तसेच दोन्ही इमारतींमध्ये महागडे एलईडी टीव्ही, फॅन, बेंच आणि इतर फर्निचर मात्र तसेच पडून आहे. या धोकादायक इमारती अचानक कोसळल्या तर हानी होण्याची भीती असल्यामुळे लवकरात लवकर पाडण्याची मागणी होत आहे.

केशवनगर माध्यमिक विभागाच्या शाळेला चाळीस वर्षांहून अधिक काळ झाला आहे. शाळेच्या इमारतीचे सज्ज वारंवार पडून याठिकाणी कित्येक वेळा डागडुजी करण्यात आली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी प्रवेशव्दारावरचे सिमेंटचे स्लॅप कोसळले होते. इमारतीला ठिकठिकाणी खंडारे पडली आहेत. वारंवार याठिकाणी इमारतीचा भाग कोसळत आहे. सध्या शाळेतील विद्यार्थ्यांचे चापेकर चौकातील शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.

स्वच्छतागृह मोडकळीस
केशवनगर माध्यमिक विभागाच्या शाळेतील स्वच्छतागृह मोडकळीस आले आहे. या ठिकाणी शौचालयातील भांडी व फरशा तुटल्या आहेत. तसेच इमारतीबरोबर शौचालय इतके जुने झाले आहे की, शेजारील झाडाची मुळे स्वच्छतागृहाच्या फरशा फोडून बाहेर पडली आहेत.

वाल्हेकरवाडी शाळा
पिंपरी चिंचवड महापालिकेची वाल्हेकरवाडी येथील शाळा तीन ते चार वर्षापूर्वीच धोकादायक ठरविण्यात आली आहे. वाल्हेकरवाडी शाळेचे बाहेरचे छत देखील एकदा कोसळले होते. यावर इमारतीची तात्पुरती डागडुजी करुन अशा धोकादायक शाळेतच विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. सहा ते सात महिन्यापूर्वी शाळा चिंतामणी चौक याठिकाणी गरजेपुरत्या सामानासह पत्राशेडमध्ये स्थलांतरित केली आहे.

पिंपरी चिंचवड नगरपालिका असताना 1978 मध्ये वाल्हेकरवाडीची शाळा बांधण्यात आली. तेव्हा जेमतेम चार खोल्या होत्या. पुढे त्याची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. शाळेची सध्याची जुनी इमारत अपुरी पडते आहे. शाळेच्या दोन्ही बाजूने वाहतुकीचे रस्ते असून शाळा मध्यभागी आहे. त्यामळे अशी धोकादायक परिस्थिती आहे. शेजारी लोकवस्ती आहे तसेच लहान मुले शाळेच्या आवारात खेळत असतात.
काही सामानाची वाहतूक करणारी वाहने याठिकाणी थांबतात. शाळेला कुंपण नसल्याने याठिकाणी वावरणार्‍यांवर धोक्याची टांगती तलवार असून कधीही काहीही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे.

सापाच्या भीतीमुळे धोकादायक शाळेत प्राथमिकचा वर्ग
माध्यमिक शाळेच्या शेजारी प्राथमिक विभागाची शाळा आहे. या शाळेलादेखील जागा अपुरी पडत असल्यामुळे एक वर्ग माध्यमिक विभागाच्या धोकादायक इमारतीमध्ये घेतला जात आहे. प्राथमिक शाळेला मागच्या बाजूस असलेला एक हॉलदेखील उपलब्ध केला होता मात्र, याठिकाणी एकदा साप निघाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसविता येत नाही.

केशवनगर शाळेचा अजूनही वापर
दोन्ही शाळांमध्ये महागडे साहित्य तसेच पडून
जागेअभावी केशवनगर शाळेत भरतोय प्राथमिक वर्ग
हानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का?

दोन्ही धोेकादायक इमारतीतील विद्यार्थी पर्यायी जागी स्थलांतर केलेले आहेत. इमारतीतील सामानाची मुख्याध्यापकांकडून माहिती घेवून सुरक्षित ठिकाणी हलविले जाईल.

                                                           -संदीप खोत,
                                               शिक्षण उपायुक्त, पिं.चिं.मनपा

Back to top button