पुणे : पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा | पुढारी

पुणे : पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लो मीटरमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही पाणी गळती कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासकीय विश्रामगृहात जायका, 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना आणि पुणे शहरातील पाणी समस्येबाबत बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचे पाणी औद्योगिक क्षेत्राला देऊन तेवढ्या प्रमाणात औद्योगिक कारणासाठी दिले जाणारे पाणी शहरासाठी वापरण्याच्या शक्यतेबाबत अभ्यास करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

जायका प्रकल्पांतर्गत नवे 11 शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार असून, त्याद्वारे 396 द. ल. लिटर मैलापाणी शुद्ध होणार आहे. त्यासाठी 19 ठिकाणी 55 किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. अमृत योजनेतून जुन्या प्रकल्पांची क्षमता वाढ करण्यात येणार आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.

पुन्हा झाडे लावणार
नदी सुधारच्या कामामुळे सुमारे सहा हजार वृक्ष तोडली जाणार आहेत. त्याविषयी विचारले असता, पाटील म्हणाले, हे खरं आहे, झाडे तोडली जाणार आहेत. यात मोठी झाडे कमी असून, मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे अधिक आहेत. जी तोडली जाणार आहेत, ती झाडे पुन्हा लावली जाणार आहेत. या लावलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी ही कंत्राटदारावर आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Back to top button