पिंपरी : देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये श्रीरंग बारणे | पुढारी

पिंपरी : देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये श्रीरंग बारणे

पिंपरी : लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे ‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणार्‍या ‘टॉप-टेन’मध्ये मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे.
148 वेळा चर्चेत सहभाग आणि 508 प्रश्न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत.

खासदार श्रीरंग बारणे दुसर्‍या स्थानावर आहेत. मागील नऊ वर्षांपासून मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अग्रभागी आहेत. तर, शिवसेनेचे श्रीकातं शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्या स्थानी आहेत.

मावळच्या जनतेने माझ्यावर सलग दोनवेळा विश्वास टाकला. देशाच्या संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. संसदेतील कामकाजात सक्रियपणे सहभाग घेऊन मतदारसंघातील प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवितो. प्रश्न मार्गी लावून घेतो. सतराव्या लोकसभेत आत्तापर्यंत 508 प्रश्न विचारले आहेत. 148 वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती 94 टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत, असे खासदार बारणे यांनी सांगितले.

Back to top button