पुणे : कलिंगड, खरबूज शेतीतून तब्बल 12 लाखांचा नफा | पुढारी

पुणे : कलिंगड, खरबूज शेतीतून तब्बल 12 लाखांचा नफा

निखिल जगताप : 

बेलसर : पुरंदर तालुक्यातील कृषिसंपदा अलीकडील काळामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पुरंदर तालुक्यातील मावडी क. प. गावातील सागर पवार व विशाल पवार या कृषी पदवीधर बंधूंनी कलिंगड आणि खरबूज शेतीमधून थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री करून चार एकर क्षेत्रामध्ये जवळपास 12 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कलिंगडाच्या मेलोडी या व्हरायटीची निवड करून रोपांची लागवड न करता थेट बियांची लागवड पवार यांनी दि. 10 डिसेंबर रोजी आपल्या शेतात केली. कुंदन या भगव्या व मृदुला या पांढर्‍या खरबुजाच्या रोपांची लागवड दि. 10 जानेवारी रोजी केली. त्यापूर्वी बेसल डोस टाकून बेड तयार केले व त्यावर ड्रीप सिस्टीम बसून 30 मायक्रॉन मल्चिंग पेपरचे आच्छादन करून बियांची व रोपांची लागवड शेतामध्ये करण्यात आली.

प्रामुख्याने चार एकर खरबूज आणि कलिंगड लागवडीसाठी उत्पन्न खर्च प्रतिएकर 1 लाख रुपये लागला, तर लागवडीनंतर जवळपास 60 ते 70 दिवसांत खरबूज आता बाजारात आले आहेत. उत्तम गुणवत्ता व ताजा माल यामुळे हे कलिंगड आणि खरबूज ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे, त्यामुळे अधिकचा दर देऊन ग्राहक थेट शेतातील खरबूज आणि कलिंगड खरेदी करण्यावर भर देत आहेत. एक दिवसाआड ड्रिपमधून खताचे डोस पुरवले जातात. खताचा आणि अन्नद्रव्यांचा वापर केल्यामुळे फवारणीतही बरेच अंतर होते, त्यामुळे फवारणीचा खर्च कमी आला आहे.

शेतकरी ते ग्राहक विक्रीला प्राधान्य
दोन एकर कलिंगड क्षेत्रामधून जवळपास एकरी 20 ते 25 टन उत्पन्न निघेल. हातविक्रीवर 20 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. तर दोन एकर खरबूज क्षेत्रामधून 18 ते 20 टन उत्पन्न निघेल, तर प्रतिकिलोस 40 रुपये हातविक्री केली जात आहे. त्यामुळे पवार यांना थेट शेतकरी ते ग्राहक विक्री करून बाजारभावापेक्षा अधिक नफा होत आहे.

मल्चिंग पेपरचा वापर उपयुक्त
पीक लागवडीच्या आधी 30 मायक्रॉन मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला. मल्चिंग पेपरमुळे पांढर्‍या मुळ्यांची वाढ चांगली होते. युव्ही किरणांमुळे व सिल्व्हर कोटिंगमुळे रसशोषक किडींचा, तसेच मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते व शेत तणविरहित राहते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

जगभरातील कुठल्याही कंपनीमध्ये ज्वारी, बाजरी किंवा इतर अन्न तयार होत नाही. त्यामुळे शेती ही अत्यंत महत्त्वाची आहे. तरुण शेतकर्‍यांनी न्यूनगंड बाजूला ठेवून आधुनिक तंत्रज्ञानावर भर देऊन मालाची थेट विक्री करण्याचे कौशल्य शिकले पाहिजे. उत्पन्नासोबतच आपला माल शेतकर्‍यांना विकता आला पाहिजे.
                                                   – विशाल पवार, कृषी पदवीधर शेतकरी

Back to top button