यंदा साडेपाच टीएमसी कमी साठा; निरा खोर्‍याच्या धरणातील पाणीसाठा | पुढारी

यंदा साडेपाच टीएमसी कमी साठा; निरा खोर्‍याच्या धरणातील पाणीसाठा

निरा; पुढारी वृत्तसेवा : निरा खोर्‍यातील निरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांत मंगळवार (दि. 14) अखेर 27.84 टीएमसी (57.61 टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर, गतवर्षी याच दिवशी चारही धरणांत 33.40 टीएमसी पाणीसाठा होता. यंदा सुमारे साडेपाच टीएमसीने पाणीसाठ्यात घट झाली आहे. हा समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकर्‍यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे निरा पाटबंधारे उपविभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

निरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांच्या पाणलोटक्षेत्रात गतवर्षी समाधानकारक पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली होती. परिणामी, शेतीसिंचनासाठी शेतकर्‍यांना फारसे पाणी लागले नाही. धरणांतील पाणीसाठा टिकून राहिला. दरम्यान, रब्बी हंगामासाठीची निरा डावा कालव्यातून आवर्तने सोडण्यात आली. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत घट झाली.

चारही धरणांची एकूण 48.329 टीएमसी इतकी उपयुक्त पाणीसाठवण क्षमता आहे. गेल्या वर्षी म्हणजेच दि. 14 मार्च 2022 रोजी धरणांमध्ये 33.40 टीएमसी (69.11 टक्के) पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठा 27.84 टीएमसीवर (57.61 टक्के) आला आहे. म्हणजेच, गेल्या वर्षापेक्षा 5.56 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा कमी आहे. तरीही निरा डावा कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुमारे 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी घट होणार आहे, असे निरा पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

निरा खोर्‍यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. चारही धरणांत आजअखेर (दि. 14) 27.84 टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांंनी काळजी करू नये.

                        – राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग

Back to top button