पुणे : स्वीडन-महाराष्ट्र यांच्यात नवे पर्व : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

पुणे : स्वीडन-महाराष्ट्र यांच्यात नवे पर्व : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वीडन इंडिया ज्युबिली सेलिब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होऊन या क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरुवात होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलिब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, राजदूत तन्मय लाल, राजदूत जॅन थेस्लेफ, ना लेकवॉल, एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा, उद्योजक बाबा कल्याणी आदी उपस्थित होते.

पुण्यातील औद्योगिकरणाला स्वीडनमधील उद्योगाच्या स्थापनेने सुरुवात झाली. क्लीन अँड ग्रीन एनर्जी, क्लीन ट्रान्स्पोर्टेशन, ग्रीन हायड्रोजन, सोलर एनर्जी आदी क्षेत्रात महाराष्ट्र आणि स्वीडनला परस्पर सहकार्याची संधी आहे. उद्योगाच्या क्षेत्रात परस्पर संबंधातील ही भागीदारी पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

स्वीडन आणि भारत यांच्यातील संबंध दीर्घकालीन असले, तरी विशेषत: तीन दशकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वीडन भेट ऐतिहासिक होती आणि या काळात दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्याचे प्रयत्न निर्णायक ठरले आहेत. स्वीडनच्या उद्योगांसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. उद्योगाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशाचे ‘पॉवर हाउस’ आहे. महाराष्ट्रात उद्योगांसाठी सुलभ वातावरण लक्षात घेता स्वीडन आणि महाराष्ट्रातील औद्योगिक भागीदारी अधिक विस्तारेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Back to top button