पुणे : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला गती | पुढारी

पुणे : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला गती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक साकारण्यासाठी राज्य शासनाने अंदाजपत्रकात 50 कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, केवळ तरतूद न करता शासनाने व महापालिकेले लवकरात लवकर या ठिकाणी स्मारक उभे करावे, अशा प्रतिक्रिया स्मारकासाठी लढा देणार्‍यांनी व्यक्त केल्या आहेत.

भाजप ओबीसी सेलच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी भिडे वाड्यासमोर पेठे वाटून व फटाके वाजवून आनंद साजरा केला. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी देशातील मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे सुरू केली.

येथे राष्ट्रीय स्मारकाचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने 2006 मध्ये मान्य केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादन कारवाई सुरू केली. यासाठी महापालिकेने नुकसानभरपाई म्हणून शासनाला 1 कोटी 30 लाख 50 हजार 58 रुपये जमा केले. मात्र, येथील व्यावसायिक आणि भाडेकरू यांनी 2010 मध्ये या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, ज्येष्ठ
कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाची बैठक घेऊन स्मारकाच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले होते.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक प्रेरणादायी ठरावे, यासाठी आमचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या प्रयत्नांना सरकारने दाद दिली आहे. आता ते प्रत्यक्षात उतरावे.

                                        – डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते

स्मारकाच्या कामाला गती मिळणार आहे. मात्र, या तरतुदीचा उपयोग न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बहुजनांच्या स्वप्नातील स्मारक लवकरात लवकर साकारण्यासाठी व्हावा.

                                           – डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर

Back to top button