मंचर : चक्क मर्सिडीजच्या भावात पटातील बैलाची विक्री! लक्ष्याची कमाल अन् बैलमालकाची धमाल | पुढारी

मंचर : चक्क मर्सिडीजच्या भावात पटातील बैलाची विक्री! लक्ष्याची कमाल अन् बैलमालकाची धमाल

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : जारकरवाडी  येथील माऊली कृपा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनबा बढेकर व सुरेश सोनबा बढेकर यांच्या बैलगाडा शर्यतीत धावणार्‍या लक्ष्या बैलाला तब्बल 30 लाख 11 हजार 111 रुपये एवढा प्रचंड भाव मिळाला. स्वत: श्याम बढेकर यांनी ही माहिती दिली. लक्ष्या बैलाने पुणे जिल्ह्यातील अनेक घाटांमध्ये विजेतेपद मिळवून बक्षिसे व नावलौकिक मिळविला आहे. या लक्ष्या बैलाची खरेदी गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील कैलास भगवंत गावडे यांनी होळी पौर्णिमा- धूलिवंदनाच्या सणाला केली आहे. आंबेगाव तालुक्यात या बैलाची किंमत विक्रमी दारात झाल्याने ’लक्ष्याची कमाल, बैलमालकाची धमाल’ अशी चर्चा सध्या तालुक्यात व तालुक्याबाहेर जोरात सुरू आहे.

बैलगाडा शर्यती हा विषय ग्रामीण भागातील बैलगाडामालक व हौशी शेतकरी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. पण, कित्येक दिवस या बैलगाडा शर्यतीवर शासनाची बंदी होती. बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रा येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलगाडे धावू लागले आहेत. त्यामुळे बैलगाडामालक व शौकीन सुखावले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यात्रा-जत्रा उत्सव सुरू झाल्याने बैलगाडा शर्यतीस ठिकठिकाणी प्रारंभ झाला असून, बैलगाडा घाटात भंडार्‍याची उधळण व धुराळा उडताना दिसत आहे. हौसेला मोल नसते, असे म्हणतात. या म्हणीचा अनुभव लक्ष्याच्या खरेदीनिमित्त आल्याचे बैलगाडामालक सांगत आहेत.

बैलगाडामालक आपल्या बैलांवर मुलांप्रमाणे जिवापाड प्रेम करतात. त्यामुळे हे बैल घाटात पळताना आपल्या मालकाची मान खाली जाणार नाही, अशा ईर्ष्येने बेफाम घाटात पळतात. या पळण्यावरच बैलाची किंमत ठरत असते. सध्या यात्रांचा हंगाम सुरू असल्याने बैलांच्या किमती वाढल्या आहेत.

संजय पोखरकर, माजी सरपंच आणि प्रसिद्ध बैलगाडामालक, वडगावपीर

सोमवारी (दि. 6) शेतकरी पोपट बढेकर यांच्याकडून लक्ष्याची खरेदी केल्यानंतर त्याने त्याच दिवशी वाफगाव (ता. खेड) येथील यात्रेत उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत ‘घाटाचा राजा’ म्हणून किताब मिळविला.

                                                        कैलास गावडे, बैलमालक

यापूर्वीही चढ्या दराने खरेदी

जुन्नर तालुक्यातील किशोर दांगट यांनी काही महिन्यांपूर्वी बजरंग नावाच्या बैलाची 25 लाख रुपयांना खरेदी केली होती. 15 दिवसांपूर्वीच पेठचे (ता. आंबेगाव) सरपंच राम तोडकर आणि ब्रिजेशशेठ धुमाळ यांनी 21 लाख 50 हजार रुपये किमतीच्या बैलाची खरेदी केली. त्यानंतर गावडेवाडी येथील शेतकरी कैलास गावडे यांनी विक्रमी भावात हा बैल खरेदी केला आहे.

Back to top button