नसरापूर : आमचा राजवाडा जनतेचा : उदयनराजे भोसले | पुढारी

नसरापूर : आमचा राजवाडा जनतेचा : उदयनराजे भोसले

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘मीसुद्धा एक तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे. मागील जन्मी कदाचित माझ्या हातून थोडसं पुण्याचं काम घडलं असावा. यामुळे एवढ्या मोठ्या छत्रपती राजघराण्यात मला जन्माचा लाभ मिळाला, असे सांगत आमचा राजवाडा हा आमचा नसून, तो तुमचा आहे. कारण स्वराज्य उभं करण्यात जितके शिवरायांचे योगदान आहे तितकेचे तुमच्या पूर्वजांचेदेखील मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

अतुल हिवाळे मित्रसमूह प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 26) माळेगाव (ता. भोर) येथील माउली अनाथाश्रमातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नवनाथ महाराज लिमन, जीवन कोंडे, आप्पासाहेब आखाडे, आयोजक अतुल हिवाळे, सुनील काटकर, उमेश मालुसरे, गोरख लिमन, अमोल शिळीमकर, राजेंद्र अहिरे, विशाल कोंडे, आदित्य बोरगे, अशोक वाडकर, संतोष शिंदे, महादेव मातेरे, वैशाली पाटील, धनश्री कटारे, नीलेश भोरडे, राकेश गाडे, गणेश चराटे, सागर मरळ उपस्थित होते.

उदयनराजे भोसले म्हणाले की, नवनाथ महाराज लिमन यांचे कार्य खूप मोलाचे असून, त्यांच्या अनाथाश्रमसाठी हिवाळे मित्र परिवाराने केलेले कार्य अतुलनीय आहे. माउली अनाथाश्रमासाठी माझ्याकडूनदेखील भरीव मदत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आशासेविकांचा सन्मान तसेच रक्तदात्यांचा सन्मान उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षा खुटवड यांनी स्वागत गीत गायले, तर शिवभक्त राहुल महाराज शिंदे यांचे व्याख्यान पार पडले. भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष वैभव भूतकर व उपाध्यक्ष माणिक पवार यांनी उदयनराजे यांचा सत्कार केला.

Back to top button