पुणे : भाजप निर्माण करतेय भीतीचे वातावरण; आदित्य ठाकरे यांची टीका | पुढारी

पुणे : भाजप निर्माण करतेय भीतीचे वातावरण; आदित्य ठाकरे यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशात भाजप भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. ही भीती केवळ राजकीय लोकांपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचणार असल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली. कसबा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री सुनील केदार आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, देशात भाजपच्या विरोधात बोलले तर एजन्सींचा वापर करून अटक केली जाते. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या चौकशीसाठी ऑडिट करण्यास आम्ही तयार आहोत, मात्र नागपूर, ठाणे, कल्याण आणि पुणे या महापालिकांचेही ऑडिट करा.’

अंबादास दानवे म्हणाले, जे पुणे करेल ते महाराष्ट्र आणि भारत करणार आहे. सध्याचे सरकार सामान्यांच्या घरावर लोखंडी नांगर फिरवत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यात रात्री बैठका घेत आहेत, बाईक रॅली काढत आहेत. काही दिवसात हे सायकलवर येतील. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. लाल महालाजवळ आदित्य ठाकरे आल्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांचे स्वागत केले.

जगतापांना देता मग टिळकांना का नको? : उद्धव ठाकरे
‘चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, मात्र पुण्यात कसबा मतदार संघातील उमेदवारी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात का दिली नाही? टिळकांबाबत सहानभुती कुठे गेली?’ असा प्रश्न माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ क्लीपच्या माध्यमातून केला. ‘खासदार गिरीश बापट गंभीर आजारी असताना त्यांना प्रचारात उतरविण्याची क्रूरता भाजपाने केली आहे. अशा पक्षांना जनता मतदान कसे करणार? भाजपविरोधात बोलणार्‍यांची चौकशी केली जाते, तुमच्याकडे गेलेल्यांचीही चौकशी करा,’ अशी मागणी ठाकरे यांनी केली.

Back to top button