राजगुरुनगर येथे अफूची शेती; एक लाख रुपयांची 61 किलो झाडे जप्त | पुढारी

राजगुरुनगर येथे अफूची शेती; एक लाख रुपयांची 61 किलो झाडे जप्त

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : राजगुरुनगर शहरातील थिगळस्थळ येथे एका शेतकर्‍याने अफूची शेती केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. याचा सुगावा लागल्याने पोलिस आणि महसूल अधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 20) छापा मारून एक लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली. आरोपी सुभाष गुलाब थिगळे(रा. थिगळस्थळ, राजगुरुनगर, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.

राजगुरुनगर शहरालगत थिगळस्थळ येथे चासकमान धरणाच्या कालव्यालगत ही अफूची शेती पिकवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. वस्तीपासून जवळच असलेल्या शेतात थिगळे याने अफूची लागवड केली होती. पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना याची माहिती मिळाली.

माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, हवालदार शंकर भवारी, संतोष घोलप, संतोष मोरे, प्रवीण गेंगजे व महसूल कर्मचारी यांनी सोमवारी (दि. 20) दुपारी छापा मारला. थिगळे यांच्या शेतात कांदा व लसून या पिकांत आंतरपीक म्हणून अफूची झाडे मिळून आली. शेतातून 61 किलो वजनाची झाडे जप्त करण्यात आली. बोंडे आल्याच्या अवस्थेत हे पीक होते. त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती जप्त केली.

Back to top button