वारजे भागातील अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार | पुढारी

वारजे भागातील अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात डुक्करखिंडीत ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. बाह्यवळण मार्गावर थांबलेल्या मोटारीच्या दरवाजावर आदळून दुचाकीस्वार तरुण रस्त्यात पडला. त्यानंतर वारजे पुलाकडे निघालेल्या ट्रकने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. बाजीराव सोमनाथ गदळे (वय 30, रा. शिव-पार्वती मंगल कार्यालयाजवळ, नर्‍हे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी ट्रकचालकासह मोटारचालकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसीम मुस्कीन सय्यद असे मोटारचालकाचे नाव आहे. पोलिस शिपाई संतोष रामदास पवार यांनी याबाबत वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गदळे बाह्यवळण मार्गावरील डुक्कर खिंडीतून वारजे पुलाकडे निघाला होता. त्या वेळी मोटारचालक सय्यद वारजे पुलाकडे निघाला होता. सय्यदच्या मोटारीत बिघाड झाल्याने त्याने मोटार बाह्यवळण रस्त्यावर मधोमध थांबविली. त्या वेळी मोटारीचा दरवाजा उघडा होता.

दुचाकीस्वार गदळे मोटारीच्या दरवाजावर आदळला आणि नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या मधोमध पडला. त्या वेळी वारजे पुलाकडे भरधाव निघालेल्या ट्रकने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वार गदळेला धडक दिली. अपघातात गदळेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिस उपनिरीक्षक पडवळे तपास करीत आहेत.

Back to top button