महाळुंगे पडवळ : दिवसा वीजपुरवठा करा; शेतकर्‍यांची मागणी | पुढारी

महाळुंगे पडवळ : दिवसा वीजपुरवठा करा; शेतकर्‍यांची मागणी

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बिबट्यांच्या भीतीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री पिकांना पाणी देणे धोक्याचे झाले आहे. महावितरण कंपनीने कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा; अन्यथा मंगळवारी (दि. 21) मंचर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा आंबेगाव तालुका विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष गणेश गाडे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाखाध्यक्ष संदीप गाडे, माजी सरपंच एकनाथ गाडे, तुकाराम गाडे आदी या वेळी उपस्थित होते. गणेश गाडे म्हणाले की, आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा मुक्तपणे संचार सुरू आहे. बिबटे माणसांवर हल्ले करू लागले आहेत. दुचाकीस्वारांसह मोठ्या वाहनांनाही अनेक ठिकाणी बिबटे आडवे जात आहेत. त्यामुळे गावागावी बिबट्यांची दहशत पसरलेली आहे. दिवसाही शेतीकामे करता येत नाहीत. अशात महावितरण कंपनीने दिवसाचा वीजपुरवठा खंडित केलेला असून, रात्रीच्या वेळी तो दिला जात आहे.

दुसरीकडे पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यांना पाणी देणे गरजेचे असल्याने जिवावर उदार होत शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत आहे. महावितरणने दिवसा वीजपुरवठा द्यावा तसेच बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने उपाययोजना राबवाव्यात. माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता वाढवावी तसेच पिंजरे व वन कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, अशा शेतकर्‍यांच्या मागण्या आहेत. याकरिता मंगळवारी (दि. 21) मंचर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही गाडे यांनी सांगितले.

पकडलेले बिबटे सोडतात तरी कोठे?
आंबेगाव तालुक्यात पकडलेले बिबटे शिरूर, पारनेर तालुक्यांच्या हद्दीत सोडले जातात. जुन्नर तालुक्यात पकडलेले बिबटे भीमाशंकर अभयारण्याच्या जवळपास सोडले जातात. शिरूर तालुक्यात पकडलेले बिबटे जुन्नर तालुका व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत सोडले जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. याबद्दल वन विभागाच्या अधिकार्‍यांकडून स्पष्टपणे काहीही सांगितले जात नाही. ते पुन्हा वास्तव्य असलेल्या ठिकाणी येतात, त्यामुळे हल्ले वाढत आहेत.

Back to top button