पुणे: भामा आसखेड धरणातून ९४० क्यूसेकने विसर्ग | पुढारी

पुणे: भामा आसखेड धरणातून ९४० क्यूसेकने विसर्ग

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा: खेडच्या भामा आसखेड धरणातून ९४० क्यूसेकने पाणी विसर्ग रविवारी (दि. १२) सुरू केला, अशी माहिती भामा आसखेड धरण करंजविहिरे उपविभाग कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे यांनी दिली. जिल्ह्यातील खेड, शिरूर, दौंड, हवेली या तालुक्यांना हरितक्रांती साठी वरदान ठरणाऱ्या दुसऱ्या आवर्तनाचा फायदा शेतकऱ्यांना शेतातील असलेल्या रब्बीसह उन्हाळी पिकांसाठी होणार आहे. पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण पसरले आहे.

खेड तालुक्याच्या करंजविहिरे येथील भामा नदीवर भामा आसखेड धरण प्रकल्प ८.१४ टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा आहे. या धरणातील पाण्याचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या तालुक्यातील शेती पिकांसह गावच्या पाणी योजनांना होत आहे. तसेच पुणे मनपाच्या पूर्व भागातील नागरिकांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी झाला आहे. धरण प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी व उन्हाळी हंगामासाठी दुसरे आवर्तन रविवारी (दि. १२) सायंकाळच्या दरम्यान धरण सांडव्याचे चारही स्वयंचलित दरवाजे वर उचलून सुरवातीला ५१५ व त्यानंतर सोमवारी (दि. १३) सकाळी ९३० क्यूसेकने पाणी विसर्ग भामा नदीत सुरू केला. भामा धरणापासून ते दौंड तालुक्याच्या आलेगाव पागापर्यंत भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याने भरल्यानंतर पाणी विसर्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाचे शाखा अभियंता निलेश घारे व सांख्यिकी अभियांत्रिकी सहाय्यक वसंत ढोकरे यांनी दिली.

सोमवारी (दि.१३) सकाळी धरण प्रकल्पात ७९.७२ टक्के पाणीसाठा म्हणजेच ६.११ टीएमसी आहे. धरणातील पाण्याची पातळी ६६८.४७ मिलिमीटर असून धरणातील एकूण पाणीसाठा १८६.६१५ दलघमी आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १७३.०९३ दलघमी आहे. पावसाळा जून २०२२ पासून आजपर्यंत एकूण १२७७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करंजविहिरे धरण प्रशासनाकडे आहे.

भामा आसखेड धरण प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे पाणी भामा नदी पात्रात सोडल्याने खेड, शिरूर, दौंड, हवेली तालुक्यातील भामा व भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीकाठी असणारे आपले कृषी पंप बाहेर काढावेत म्हणजे कृषी पंपाचे नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांनी जनावरांना नदीतील पाण्याच्या प्रवाहात उतरू देऊ नये. सोडलेल्या पाण्याचा फायदा रब्बीसह उन्हाळ्यातील पिकांना होणार आहे. भामा आसखेड धरण ते थेट दौंड तालुक्याच्या आलेगावपागा पर्यंत भामा व भीमा नदीवरील असणारे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरल्यावर पाणी विसर्ग बंद करण्यात येणार आहे.

– तुळशीदास आंधळे, उपविभागीय अधिकारी, करंजविहिरे भामा आसखेड धरण प्रकल्प

Back to top button