पुणे : मविआची आज बैठक ; भाजपही मित्रपक्षांशी आज संवाद साधणार | पुढारी

पुणे : मविआची आज बैठक ; भाजपही मित्रपक्षांशी आज संवाद साधणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ मतदारसंघासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी सकाळी मुंबईत होणार आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडे त्यांच्या पक्षातील इच्छुकांनी आग्रही मागणी केली आहे. भाजपनेही अद्याप उमेदवार ठरविला नसून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील  शुक्रवारी मित्रपक्षांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेसच्या प्रदेश समितीने रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर आणि कमल व्यवहारे यांची नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठविली आहेत. भाजपकडून शैलेश टिळक, हेमंत रासने, गणेश बीडकर, धीरज घाटे यांच्या नावांची चर्चा स्थानिक कार्यकर्त्यांत सुरू आहे.

अजित पवारांची इच्छुकांशी चर्चा
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात पक्षातील इच्छुक उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. पवार या वेळी पत्रकारांना म्हणाले, मी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. अन्य पक्षही त्यांच्या इच्छुकांशी चर्चा करीत आहेत. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असताना कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेसने निवडणूक लढविली होती. आता शिवसेनाही आघाडीत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा होईल. त्यामध्ये मतदारसंघ कोणत्या पक्षाला द्यावयाचा ते ठरेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय सर्वजणच मान्य करतील.

काँग्रेसच्या प्रदेश समितीची बैठक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रदेशातील निवडणूक समितीची बैठक गुरुवारी घेतली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. कसबा पेठचे पक्षाचे प्रभारी आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदेही उपस्थित होते. पक्षाच्या सर्व इच्छुकांसंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर तिघांची नावे केंद्रीय समितीकडे पाठविण्याचे ठरले.

महाविकास आघाडीची बैठक

पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते यांची शुक्रवारी सकाळी बैठक होणार आहे. त्यानंतर, पटोले दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. ते चार फेब—ुवारीला पुण्यात येणार असून, तेच पक्षातर्फे कोणाला उमेदवारी देण्यात येणार आहे, ते स्पष्ट करणार आहेत. निर्णय हा पक्षातर्फे घेण्यात येणार असून, तो कोणत्याही नेत्यांच्या दबावाने घेण्यात येणार नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पटोले पुण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेची बैठक होणार 

शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे, सचिन अहिर हे चिंचवड व कसबा पेठ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांशी शुक्रवारी सकाळी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्या बैठकीतील मुद्दे ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना कळवतील. त्यामुळे महाविकास आघाडीची बैठक होण्यापूर्वी शिवसेनेची बैठक होणार असल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत असल्याचे पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज स्पष्ट केले.

‘आप’देखील रिंगणात
आम आदमी पक्षाचे सहप्रभारी गोपाळ इटालिया हे गुजरातचे असून, ते शनिवारी पुण्यात येणार आहेत. आपच्या सात प्रमुख इच्छुकांशी बैठक गुरुवारी झाली. आप पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आपचा निर्णय रविवारी होण्याची शक्यता असल्याचे पक्षाचे राज्य निमंत्रक विजय कुंभार यांनी सांगितले.

मनसेचीही तयारी सुरू
मनसेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक शुक्रवारी होणार आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे पाच आणि सहा फेब—ुवारीला पुण्यात येणार आहेत. त्या वेळी निवडणूक लढवायची की नाही, त्याबाबतचा निर्णय होणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
अद्याप अर्ज दाखल नाही
कसबा पेठ मतदारसंघात 31 जानेवारीपासून आजपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला
नाही. महत्त्वाच्या पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे, प्रमुख उमेदवारांचे अर्ज सोमवारी व मंगळवारीच दाखल होतील, असा अंदाज आहे.

भाजपचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात
भाजपने विरोधकांकडे बिनविरोध निवडणूक करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या प्रदेश कोअर समितीची आज मुंबईत बैठक झाली. मात्र, त्यातील चर्चेला तपशील स्थानिक नेत्यांना कळालेला नाही. पालकमंत्री पाटील शुक्रवारी भाजपच्या मित्रपक्षांच्या नेत्यांशी पुण्यात चर्चा करणार आहेत. त्यांची बैठक होणार आहे. कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याने, पक्षात टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी देणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. उमेदवाराचा अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडूनच घेतला जाईल, असे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या नावासंदर्भात सर्वेक्षणही केले आहे. त्यातील निर्णयाचाही परिणाम उमेदवार ठरविण्यावर होणार आहे. कसबा पेठ मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याने, तेथे विजय मिळविण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने प्रचाराला उतरणार आहे.

कसबा पेठ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून 6 उमेदवार इच्छुक आहेत. कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीच्या उद्या शुक्रवारी होणार्‍या बैठकीत यावर निर्णय होईल.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Back to top button