पुणे : बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात | पुढारी

पुणे : बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चवीला आंबट-गोड असणार्‍या सोलापूरच्या बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात चमेली, उमराण व चेकनट आदी बोरांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी चांगली असल्याने त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. संक्रांतीनंतर बोरांच्या आवकेत घट झाली असून, पुढील पंधरा ते वीस दिवस हंगाम सुरू राहील, असे बोरांचे व्यापारी प्रनील शहा यांनी सांगितले. थंडीमुळे कलिंगड व खरबुजाच्या आवकेसह मागणीतही घट झाली आहे.

परिणामी, कलिंगडाच्या भावात किलोमागे दोन, तर खरबुजाच्या भावात किलोमागे पाच रुपयांची घट झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक -जावक कायम असून, गेल्या आठवड्यातील दर टिकून आहेत. रविवारी (दि. 29) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 35 ते 40 टन, मोसंबी 40 ते 50 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 7 ते 8 टेम्पो, लिंबे सुमारे 2 हजार ते 2 हजार 500 गोणी, पेरू 400 ते 500 क्रेटस, कलिंगड 8 ते 10 गाड्या, खरबूज 8 ते 10 गाड्या, बोरे 400 पोती, किन्नू चार ते पाच हजार बॉक्स व सफरचंदाची दोन ते अडीच हजार पेटी इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 200-300, अननस : 100-500, मोसंबी : (3 डझन) : 180-320, (4 डझन) : 60-150, संत्रा : (10 किलो) : 300-700, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 20-230, गणेश : 10-50, आरक्ता 20-80. कलिंगड : 8-10, खरबूज : 25-28, पपई : 12-25, पेरू (20 किलो) : 500-600, चिक्कू (10 किलो) : 100-500, बोरे (10 किलो) : चेकनट : 700-1100, उमराण : 80-150, चमेली : 280-350, चण्यामण्या : 600-700.

Back to top button