पुणे प्रादेशिक विभागात 6 हजार 72 अपघात; द्रुतगती मार्गांवर तीन वर्षांत 3340 बळी | पुढारी

पुणे प्रादेशिक विभागात 6 हजार 72 अपघात; द्रुतगती मार्गांवर तीन वर्षांत 3340 बळी

प्रसाद जगताप

पुणे : द्रुतगती मार्गांवर रोज कुठे ना कुठेतरी अपघात होत असतात. गेल्या तीन वर्षात पुणे प्रादेशिक विभागात असे तब्बल 6 हजार 72 अपघात झाले आहेत. यात 3 हजार 340 जण मृत्युमुखी पडले, तर 5 हजार 887 जण जखमी झाले. अमृतांजन पुलापासून आळेफाटा, नगर, सोलापूरपर्यंत आणि सातारा रस्त्याने सांगली, कोल्हापूरपर्यंतच्या द्रुतगती मार्गांवर महामार्ग पोलिसांचा पुणे प्रादेशिक विभाग विस्तारलेला आहे.

या विभागांतर्गत पुणे महामार्ग पोलिस कार्यरत असतात. त्यांच्या माध्यमातून द्रुतगती मार्गांवर वाहतुकीचे नियमभंग करणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यासोबतच ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांमार्फत आयआरबी, एमएसआरडीसी, आरटीओ यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, 2020, 2021 आणि 2022 या तीन वर्षांच्या कालावधीत महामार्ग पोलिसांच्या पुणे प्रादेशिक विभागात अपघातात 3 हजार 340 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या वर्षी अपघातांमध्ये घट…
2020 आणि 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये अपघातांची संख्या 100 ते 150 ने कमी झाली आहे. तर मृत्यूंमध्येही 100 ने घट झाली आहे. 2022 मध्ये कोरोना काळ नव्हता, अन या काळात वाहनांची खरेदीसुध्दा वाढली होती. परंतु, 2022 मध्ये महामार्ग पोलिस प्रशासनाला अपघात कमी करण्यात काही प्रमाणात यश आल्याचे दिसत आहे.

कोरोनातसुद्धा अपघात अधिक
2020 आणि 2021 मध्ये कोरोना काळ होता. त्या काळात सर्व व्यवहार बर्‍यापैकी बंद होते. मात्र, तरीसुध्दा या काळात महामार्ग पोलिसांच्या पुणे प्रादेशिक विभागात मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते, असे माहितीतून समोर आले आहे. रस्ते मोकळे असल्याने ‘ओव्हर स्पीड’मुळेच हे अपघात झाल्याचे समोर येत आहे.

वर्ष अपघात बळी जखमी
2020 1973 1130 1811
2021 2148 1161 2023
2022 1951 1049 2053
एकूण 6072 3340 5887

महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना करत आहोत. 2020 -21 च्या तुलनेत 2022 मध्ये वाहनांची संख्या वाढली असतानासुध्दा आम्हाला 2022 मध्ये काही प्रमाणात अपघात कमी करण्यात यश आले आहे.आम्ही सीसीटिव्ही, स्पीड गनच्या माध्यमातून होणार्‍या कारवायांचे स्वरूप तीव्र केले आहे. पथकांच्या संख्येत वाढ केली असून, ब्लॅक स्पॉट कमी करण्यावर भर दिला आहे.

                     – लता फड, महामार्ग पोलिस अधीक्षक, पुणे प्रादेशिक विभाग

Back to top button