सरपंचांनी विश्वासार्हता टिकवून पारदर्शी काम करावे; माजी मंत्री सचिन अहिर यांचा सल्ला | पुढारी

सरपंचांनी विश्वासार्हता टिकवून पारदर्शी काम करावे; माजी मंत्री सचिन अहिर यांचा सल्ला

नसरापूर(ता .भोर); पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्याच्या विकासासाठी उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करणार असून, विकासासाठी सरपंचांनी निधीपेक्षा निष्ठा जपावी. विश्वासार्हता टिकवून जनतेची पारदर्शी कामे करा. ज्या ठिकाणी अडचण येईल, त्या ठिकाणी आपल्या पाठीशी कायम उभे राहू, अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंचाना विधान परिषदेचे आमदार तसेच माजी मंत्री सचिन अहिर यांनी दिली.

शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी भोर तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित वरवे (ता. भोर) येथे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सन्मान कार्यक्रमात अहिर बोलत होते. यावेळी आयोजक कुलदीप कोंडे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, शलाका कोंडे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुमंत कंक, संतोष मोहोळ, शंकर मांडेकर, दीपक दामगुडे, नारायण कोंडे आदी उपस्थित होते. भास्कराव पेरे पाटील यांनी सरपंच कसा असावा यांचे मूलमंत्र खुमासदार पद्धतीने व्याख्यानाद्वारे मांडले.

आयोजक कुलदीप कोंडे म्हणाले की, सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील नाते दृढ असावे. काही वेळा विकासकामांमध्ये कोणाच्या तरी एकाच्या सांगण्यावरून खोडसाळपणा होत असेल, तर ते खोडून काढण्याचे काम सरपंच आणि सदस्यांना अधिकार आहे.
गणेश धुमाळ, आदित्य बोरगे, महेश कोंडे, प्रमोद शिळीमकर, सचिन बांदल, प्रवीण धावले, शुभम पवार, सुरज जगताप यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

मिंधे सरकारचे लोकप्रतिनिधी वाचाळ
विकासकामांसाठी खासदार, आमदार अथवा मंत्र्यांची शिफारस लागत नाही. कायद्याच्या अधीन राहून शासकीय सचिवस्तरावर विकासकामे होत असल्याचे सांगत सध्याचे मिंधे सरकारचे लोकप्रतिनिधी वाचाळ वक्तव्य करून राज्यात भकास वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप अहिर यांनी केला.

Back to top button