पुणे : एमपीएससी परीक्षेत ब्लूटूथ वापरणार्‍यावर गुन्हा | पुढारी

पुणे : एमपीएससी परीक्षेत ब्लूटूथ वापरणार्‍यावर गुन्हा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या परीक्षेदरम्यान एक उमेदवार ब्लूटूथचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले.
संबंधित गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने संबंधित उमेदवारावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एमपीएससीने टि्वटद्वारे ही माहिती दिली. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या औरंगाबाद येथील केंद्रावर परीक्षेच्यावेळी ब्लूटूथजवळ बाळगल्याबद्दल सचिन नवनाथ बागलाने या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एमपीएससीने टि्वटमध्ये नमूद केले.

एमपीएससीकडून रविवारी राज्यातील सहा केंद्रांवर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 घेण्यात आली. स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांकडून तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वारंवार निदर्शनास आले आहेत. अशा प्रकरणात एमपीएससी कडून फौजदारी कारवाईसह संबंधित उमेदवारांना प्रतिरोधितही करण्यात आले आहे.

Back to top button