वडगाव रेल्वे स्थानकावर आढळला तरुणाचा मृतदेह | पुढारी

वडगाव रेल्वे स्थानकावर आढळला तरुणाचा मृतदेह

वडगाव : येथील रेल्वे स्थानकावर 19 वर्षीय युवक मृतावस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार (दि. 13) रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. सदर युवकाची अद्याप ओळख पटलेली नसून रेल्वे पोलिस त्याच्या वर्णनानुसार शोध घेत आहेत.
लोहमार्ग पोलिस अंमलदार प्रशांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव रेल्वे स्थानकावरील कट्ट्यावर सदर बेवारस तरुणाचा मृतदेह आढळला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 19 असून, त्याचा कुठल्यातरी जुन्या अंगरोगाने मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मात्र, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही अथवा त्याच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही; तसेच तरुण असल्याने पोलिसही कसून शोध घेत आहेत. दरम्यान, 5.7 फूट उंची, अंगाने सडपातळ, रंगाने काळा सावळा, नाक सरळ असे संबंधित मृत तरुणाचे वर्णन असून, त्याच्या अंगावर आकाशी रंगाचा फूल बाह्याचा शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट असे कपडे घातलेले आहे.  या वर्णनानुसार मयत व्यक्तीची ओळख पटल्यास तत्काळ रेल्वे पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button