अखेर 19 वर्षांनंतर पुणे बाजार समितीची निवडणूक; प्रशासकीय राजवटीचा अंत | पुढारी

अखेर 19 वर्षांनंतर पुणे बाजार समितीची निवडणूक; प्रशासकीय राजवटीचा अंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अग्रगण्य आणि उत्पन्नामध्ये मुंबईनंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया अखेर सुरू करण्याचे आदेश शुक्रवारी (दि. 13) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांच्या या आदेशामुळे 19 वर्षांपासूनच्या प्रशासकीय राजवटीचा अंत झाला असून, लोकनियुक्त संचालक मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 एप्रिल 2023 रोजी मतदान होणार आहे. या निर्णयामुळे हवेली तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारामुळे मूळच्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ 2003 मध्ये जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्त केले होते. त्यानंतर राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले, तरी लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्याऐवजी प्रशासक, प्रशासकीय मंडळ, पुन्हा प्रशासक राज आणून निवडणुका लांबविण्यात सर्वांनीच धन्यता मानली.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी आदेशात बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत विविध उच्च न्यायालयाचे संदर्भ नमूद केले आहेत. त्यामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 12254/2022 दाखल आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे ग्रामीण यांच्याकडून दाखल पत्र दिनांक 14 नोव्हेंबर 2022 च्या अनुषंगाने या बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात प्राधिकरणाकडून निर्णय घेण्यात येईल, असे म्हणणे प्राधिकरणाने याचिकेतील सुनावणीवेळी मांडले असून, न्यायालयाने आदेशात ही बाब अधोरेखित केलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोरील याचिका आणि इतर संलग्न याचिकामध्ये 5 जानेवारी रोजी आदेश पारित करून राज्यातील निवडणुकीस पात्र सर्व बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया 30 एप्रिल 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत आदेशित केले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार क्षेत्रातील बहुतांशी प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. त्यानुसार पुणे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू करावी, या बाजार समितीच्या निवडणुकीकरिता आवश्यक असणारी प्राथमिक मतदार यादी ही दिनांक 1 जानेवारी 2023 च्या अर्हता दिनांकावर (कट ऑफ डेट) तयार करावी, संपूर्ण मतदार यादी कार्यक्रम प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावा असेही आदेशात नमूद केले आहे.

असा आहे मतदार यादीचा कार्यक्रम
जिल्हा उपनिबंधक व गटविकास अधिकार्‍यांकडून सदस्य सूची मागविणे 27 जानेवारी, प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरिता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्त करणे 31 जानेवारी, बाजार समिती सचिवाने नमुना 4 मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करणे 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, बाजार समिती सचिवाने प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे (कृषी उत्पन्न बाजार समिती) सादर करणे 15 फेब्रुवारी, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी ती प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 20 फेब—ुवारी, त्यावर आक्षेप वा हरकती या 20 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 पर्यंत मागविण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकारी 15 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करतील.

27 मार्चपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार
आदेशान्वये निवडणूक अधिकारी 27 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील, नामनिर्देशन करण्याचा शेवटचा दिनांक 27 मार्च ते 3 एप्रिल राहील. दाखल नामनिर्देशन, अर्जांच्या यादीच्या प्रसिध्दीचा दिनांक नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या शेवटच्या दिनाकांपर्यंत जसजशी मिळतील त्याप्रमाणे राहील. अर्जांची छाननी 5 एप्रिल, छाननीनंतर वैध अर्जांच्या प्रसिध्दी 6 एप्रिल रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 20 एप्रिल आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्याचा व चिन्हांचे वाटप 21 एप्रिल रोजी होईल. पुणे बाजार समितीसाठी 29 एप्रिल 2023 रोजी मतदान होईल. तर 30 एप्रिल रोजी मतमोजणी पूर्ण होताच निकाल घोषित करण्यात येईल, असेही डॉ. खंडागळे यांनी नमूद केले आहे.

Back to top button