deputy cm ajit pawar : ‘या’ कारणावरून अजित पवार अधिकाऱ्यांवर चिडले | पुढारी

deputy cm ajit pawar : 'या' कारणावरून अजित पवार अधिकाऱ्यांवर चिडले

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील विकासकामांबाबत कोणताही हलगर्जीपणा करू नका. ही कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी भूसंपादनाची अडचण असेल ती तातडीने सोडवा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी शनिवारी बारामतीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

भिगवण येथील सेवा रस्त्यासाठी रेल्वेकडून जागा मिळत नसेल तर त्यांच्या मालधक्क्याकडे जाणारी वाहने यापुढे जावू देवू नका, त्याशिवाय रेल्वे विभागाला जाग येणार नाही. त्यांना कुठे तक्रार करायचीय ती करू द्या, या शब्दात त्यांनी रेल्वे खात्याविषयी नाराजी व्यक्त केली.

सेवा रस्ता करा अन्यथा

रेल्वे विभाग मालधक्क्यातून पैसे कमवतो आहे. सेवा रस्ता केला तर तो नागरिकांसह त्यांनाही उपयोगी पडणार आहे.

लोकांना जायला-यायला त्रास होणार नाही. पण ते जाग्यावर येत नसतील तर वाहने जावू देवू नका, असे आदेश पवार (deputy cm ajit pawar) यांनी दिले.

खासदार सुप्रिया सुळे मागील आठवड्यात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेवून माझ्याकडे आल्या.

परंतु त्यांनी माझ्या हातात एवढे नाही, मी एवढेच करू शकतो, असे सांगितले. त्यामुळे त्यांची वाहने बंदच करून टाका.

प्रत्येकवेळी अधिकारी टेंडर निघाले नाही, जागेची अडचण आहे, अशी कारणे देतात. हे बरोबर नाही. मला ही कामे लवकर मार्गी लागणे अपेक्षित आहे. बारामतीत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषदेत नवीन अधिकाऱयांची टीम आलेली आहे. त्यांनी तात्काळ कामे मार्गी लावावीत. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता, तुमचे सीई म्हणतात मी स्वतः बारामतीत जावून बघून आलो. मग काम का मार्गी लागत नाही, अशी विचारणा पवार यांनी केली.

बारामतीत पोलिस दलाचे डॉग ट्रेनिंग सेंटर होणार

बारामतीत पोलिस दलाचे डॉग ट्रेनिंग सेंटर होणार आहे. त्यासाठी २० एकर जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही पवार यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर मनोज लोहिया यांना दिली. त्यालाही निधी दिला जाईल. वसाहतीसह अप्पर पोलिस अधिक्षक, कारागृहाचे काम गतीने व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कामात दिरंगाई होवू देवू नका, अशी सूचना त्यांनी केली.

वृक्ष लागवडीच्या कामाबाबत त्यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱयांना दिल्या. तुम्ही बारामती तालुक्यातील आहात, थोडी तरी आत्मियता ठेवा, असेही पवार म्हणाले.

मेडदचा पुल व टीसी कॉलेजकडे जाणाऱ्या पुलाचे काम तात्काळ मार्गी लावा, पुढील वेळी मी तिथे भल्या सकाळीच दौरा करणार असल्याचे त्यांनी जलसंपदाच्या अधिक्षक अभियंत्यांना सांगितले.

Back to top button