बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील काटेवाडी सारख्या ग्रामीण भागातील अल्ताफ शेख या तरुणाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. ते येथील राष्ट्रवादी करिअर अॅकेडमीचे विद्यार्थी आहेत. शाळेत असताना भजी व चहा विक्रीचे काम करणारा तरुण जिद्दीने व अविरत परिश्रमाने या पदावर पोहोचला आहे.
शनिवारी (दि. २५) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेख यांचे कौतुक करून त्यांचा आदर्श अन्य तरुणांनी घ्यावा असे आवाहन केले. यापूर्वी तालुक्यातील प्रशांत होळकर व विक्रमसिंह खलाटे हे आयपीएस झाले आहेत. या दोघांच्याही कामाचे अजित पवार यांनी कौतुक केले.
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी करिअर ॲकॅडमी सुरु केली आहे. याच अॅकॅडमीतून शिक्षण घेतलेला अल्ताफ शेख हे आयपीएस अधिकारी बनले आहेत.
अल्ताफ यांची कहाणी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असताना या अगोदर असिस्टंट कमांडट बनले होते.
इस्लामपूर येथे नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलेले अल्ताफ यांनी फूड टेक्नॉलॉजीतून बीटेकची पदवी प्राप्त केली आहे. २०१३ पासून ते बारामतीत वास्तव्यास आहेत. तर सध्या इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत.
या यशाबद्दल अल्ताफ शेख हे म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी मोठी मदत केली. पुण्यात अभ्यास करताना त्यांनी सहकार्य केले.
माझ्या काकांनी कर्ज काढून शिक्षणासाठी मदत केली. यशाचा आनंद मोठा आहे. त्यांना येथील राष्ट्रवादी करिअर अॅकेडमीचे समीर मुलाणी यांनी मार्दर्शन केले. या अॅकेडमीतून आजवर ४७ राजपत्रित अधिकारी झाले आहेत.
हेही वाचलंत का?