मुंबई; पुढारी ऑनलाईन : आरोग्य विभाग पदभरतीच्या वर्ग क व ड वर्गातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत काल दिली होती. दिनांक २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता आज राजेश टोपे यांनी परीक्षा होणार की नाही, याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राजेश टोपे म्हणाले की आज आणि उद्या होणारी परीक्षा रद्द झाली. पण, ही परीक्षा रद्द झालेली नाही तर ती पुढे ढकललीय. आरोग्य खात्यातील पदभरतीची परीक्षा होणारचं. प्रश्नपत्रिका संदर्भातील काही त्रुटी राहिल्या आहेत. कंपनीने ते काम वेळेत पूर्ण केलेलं नाही. पण, पेपरमध्ये कुठेही गडबड नाही.
टोपे पुढे म्हणाले, प्रश्नपत्रिका तयार करणे एवढंच राज्य सरकारचं काम आहे. खासगी कंपनीने १० दिवस वेळ मागितलाय. त्यामुळे परीक्षा लांबणीवर गेलीय.
६ हजार २०० पदांसाठी गट क आणि गट ड च्या परीक्षा शंभर टक्के होणारचं आहेत. मानसिक त्रास झालेल्या विद्यार्थ्यांप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो. उद्या बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाची रद्द झाल्या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली आहे. परीक्षा वारंवार परीक्षा रद्द होतेय. विद्यार्थ्यांमध्ये खूप नाराजी आहे. ज्यांनी पैसे खर्च केले. त्या विद्यार्थ्यांचं काय? राज्य सरकारचं काय चाललंय कळत नाही. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
५ लाख ते १० लाख गोळा करण्यासाठी दलाल काम करताहेत. या घोळाची चौकशी झाली पाहिजे. काही दलाल मार्केटमध्ये आलेत. कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.